कामगिरी उंचावण्यासाठी बंगळुरू, दिल्ली खेळणार

0

बेंगळुरू । हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) रविवारी बंगळुरू एफसी आणि दिल्ली डायनॅमोज यांच्यात येथील श्री कांतीरवा स्टेडियमवर लढत होत आहे. सलामीला दोन्ही संघांनी सफाईदार विजय संपादन केले. यानंतर दुसर्‍या फेरीच्या लढतीत कामगिरी आणखी उंचावण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील. बंगळूरू एफसीने आयएसएल पदार्पणात मुंबई सिटी एफसीला 2-0, तर दिल्लीने एफसी पुणे सिटीला 3-2 असे हरविले. तीन गुण मिळाले असले तरी दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांचे तेवढ्यावर समाधान नाही. त्यांना आणखी भक्कम डावपेच लढवायचे आहेत. बंगळुरू एफसीचे प्रशिक्षक अल्बर्टो रोका यांनी सांगितले की, मी कामगिरीबाबत फार आनंदी नाही. केवळ जिंकण्याचा मुद्दा नसतो, तर कशा पद्धतीने जिंकता हे सुद्धा महत्त्वाचे असते. आम्ही त्यादिशेने वाटचाल करीत आहोत. जिंकायला प्रत्येकालाच आवडते, पण प्रशिक्षकाला कधीही आनंदी राहून चालत नाही. कामगिरीत सुधारणा सतत करावी लागते. स्पेनच्या रोका यांच्यामते संघाला स्पर्धेच्या खडतर टप्प्यापूर्वी थोडी सुधारणा करण्यास वाव आहे.

होणार चुरशीची लढत
त्या टप्प्यात संघ तीन सामने प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर खेळेल. आधी पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळवायचे आणि मग जेतेपदाची मोहीम हाती घ्यायची अशा धोरणाचा त्यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, दिल्लीविरुद्धचा सामना अवघड असेल. मला दिल्लीचे प्रशिक्षक माहित आहेत. त्यांच्या गाठीशी बराच अनुभव आहे. मी दिल्लाचा एकच सामना पाहिला. त्यांचा खेळ बराच संघटित असल्याचे तुम्ही पाहू शकता. त्यांची खेळामागील दृष्टीसुद्धा दिसून येते. त्यामुळे आम्हाला चुरशीच्या लढतीसाठी सज्ज व्हावे लागेल.

बंगळुरू एफसी आणि दिल्ली डायनॅमोज सारख्याच शैलीचा अवलंब करतात. चेंडूवर ताबा ठेवायला त्यांना आवडते. दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यात चेंडूवरील ताब्याची टक्केवारी 60 पेक्षा जास्त राखली.

शैली सारखीच असली तरी त्यापासून लांब जाणारा खेळ करणार नाही, असे पोर्तुगाल यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, रोका यांच्या रुपाने बेंगळुरूकडे चांगले प्रशिक्षक आहेत. माझ्या संघासारखाच खेळ त्यांचा संघ करतो. ते झुंज देतात. आम्ही नैसर्गिक खेळ करू.