कामतवाडी गाव धरणगाव तालुक्यात समाविष्ट करा

0

अमळनेर। भौगोलिकदृट्या धरणगाव तालुक्याच्या हद्दीत असलेले मात्र शासनाच्या दप्तरी अमळनेर तालुक्यात असलेल्या कामतवाडी गावाला दैनंदिन गरजा भागविण्यासाठी 17 वर्षांपासून अडचणी सहन कराव्या लागत आहे. हे गाव धरणगावमध्ये समविष्ट करण्यासाठी गावाने राज्यपालांकडे केलेल्या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानुसार कामकाज सुरू आहे.

राजकिय दबावावरून गाव अमळनेर तालुक्यात
26 जून 1999 ला धरणगाव तालुक्याची निर्मिती झाली. तेव्हा अमळनेर तालुक्याची काही गावे धरणगाव तालुक्याला जोडण्यात आली होती. त्यात कामतवाडी या गावाचाही समावेश होता. सुमारे एक वर्ष धरणगाव तालुक्यात राहिल्यानंतर गावाच्या मागणीनुसार राजकीय दबावात हे गाव पुन्हा 16 ऑक्टोबर 2000 मध्ये अमळनेर तालुक्यात आले. मात्र, त्यावेळी नांदेड, नारणे ही गावे धरणगाव तालुक्यातच राहिली. परिणामी कामतवाडीचे चहू बाजूचे शिवार धरणगाव तालुक्यात आहे. म्हणजे गावचे क्षेत्र धरणगावात मात्र गाव अमळनेर तालुक्यात अशी स्थिती झाली. कदाचित हे महाराष्ट्रातील एकमेव गाव असावे.

गाव धरणगावपासून 15 किमी अंतरावर
अमळनेरपासून 35 किलामीटरवर हे गाव आहे. तर धरणगावपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. दळणवळण, शैक्षणिक, बाजारपेठसाठी त्यांना धरणगाव सोयीस्कर आहे. बँक देखील धरणगावची जवळ, शेती धरणगाव हद्दीत आणि पशु वैद्यकीय दवाखाना ही नांदेडचा फक्त चार किलोमीटर आहे. गावाची गैरसोय दूर करण्यासाठी सरपंच अलकाबाई भगवान पाटील यांनी 15 ऑगस्ट 2016 रोजी ग्रामसभेत कामतवाडी गावाचा समावेश पुन्हा धरणगाव तालुक्यात करण्यासाठी ठराव करून राज्यपालांकडे व मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली होती. राज्यपालचे कक्ष अधिकारी नि.ग.सोनखासकर यांनी दखल घेऊन जिल्हाधिकार्‍यांना अहवाल पाठविण्याची सूचना केली आहे.