कायदा करायच्या आधीच कायद्याची अंमलबजावणी

0
 गलथान कारभाराचा पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप
मुंबई :- या सरकारचे काय कळतच नाही, गलथान म्हणण्याच्या पलीकडे कारभार गेला असून कायदा पूर्ण मंजूर करायच्या आधीच कायदयाची अंमलबजावणी करायचा विक्रम सरकारकडून झाला आहे, असा आरोप आज विधानसभेत काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. मोटार वाहन कर कायद्याचे सुधारणा विधेयक मंजूर करत असताना चव्हाण यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
आज विधानसभेत महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा विधेयक मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. मोटार वाहन कर कायद्याची अधिसूचना 17 ऑक्टोबर 2016 रोजी काढण्यात आली. परंतु यावेळी तारीखच टाकण्यात आली नसल्याचे समोर आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्यावर कमाल म्हणजे 24 ऑक्टोबर 2016 पासून हा उपकर वसुल करण्यात आल्याचे ते म्हणाले. हे काय चाललेय? सरकार बेकायदेशीरपणे काम करतेय का? असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला. अधिकारी वर्ग काय करतोय, हे लोक एवढे निवांत का, का कोणालाच काही पडलेले नाही, असे व्यथित होऊन चव्हाण यांनी विचारले. हे विधेयक दोन वर्षे का अडकले, असे विचारून कायदा अधिकारी काय करतायत असे सवाल त्यांनी उपस्थित केले. याबाबत या बेकायदेशीर वाहन कर वसुलीवरून कोणी न्यायालयात गेले तर सरकारला माघार घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले. हे एवढे गंभीर प्रकरण असून याबाबतीत राज्याच्या मुख्य सचिवांना ताकीद द्या. तसेच यापुढे असे घडू नये याची काळजी घ्या, अशी सुचनाही चव्हाण यांनी यावेळी केली.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावर बोलताना चव्हाण यांनी उपस्थित केलेला आक्षेप मान्य केला. तसेच ही चूक झाली असल्याचेही कबूल केले. आता आम्ही चांगल्या प्रकारे विधेयक सादर केलेय, असे सांगून मोटार वाहन कर सुधारणा विधेयक मंजूर करून त्यांनी हा विषय संपवला.