कायदा व सुव्यवस्थेची सीआयडी चौकशी करा

0

नंदुरबार । नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात गुंडगिरी व दहशतीचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले असून येथील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्यास कारणीभूत असलेल्या लोकांसह शहादा पोलिसांची सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाने केली आहे. या मागणीसाठी गुरुवार दिनांक 29 जूनपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यात येणार आहे.नंदुरबार जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून या जिल्ह्यात सरकारने विशेष लक्ष पुरविले आहे. कुपोषणावर राज्य सरकार विविध उपाय योजना अखात असले तरी या जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात सरकारच्या गृहविभागाला सपशेल अपयश आल्याचा आरोप पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विक्की मोरे यांनी केला आहे.

तालुक्यात गुंडगिरीने केला कहर
तालुक्यात मागील एक वर्षापासून गुंडगिरीने कहर केला असून दिवसाढवळ्या खून लुटमार मारामार्‍यासह अवैध धंद्यामुळे हा जिल्हा बदनाम होत चालल्याची खंत मोरे यांनी व्यक्त केली आहे. शहादा तालुक्यात कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसविली जात असतानाच येथील पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांचा गुंडांवर कोणताही वचक नसल्याने पोलिसांच्याच सहकार्याने येथील गैरप्रकार वाढल्याचा आरोप करतानाच गुंडांची दहशत व पोलिसांचे साटेलोट्यामुळे तक्रारदार देखील पुढे येत नसल्याची तक्रार मोरे यांनी मुख्यमंत्री,गृहराज्यमंत्री,व पोलीस महासंचालकांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करीत असतानादेखील कार्यवाही होत नसल्याने आपण शहादा येथील नागरिकांसह मुंबईत उपोषण आंदोलन करीत असल्याचे मोरे यांनी सांगितले.