पिंपरी-चिंचवड : रिक्षा, सहा सिटर, जीप अशा वाहनातून होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी शहरातील मुख्य चौकात, महामार्गालगत फलक लावण्यात आले आहेत. मात्र, हे फलकच अवैध असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडी या मार्गावर वाहतूक पोलिसांच्या वतीने अवैध फलक लावण्यात आल्याची तक्रार महापालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अॅड. सागर चरण यांनी पालिकेच्या सारथी हेल्पलाईनवर केली आहे.
चित्रे आक्षेपार्ह
याबाबत चरण यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रिक्षा, सहा सिटर, जीप अशा वाहनातून होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या जनजागृतीचे फलक शहराच्या मुख्य चौकात दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. हे फलक अवैध आहेत. त्यामुळे कायदा सांगणारेच जर कायदा मोडू लागल्यानंतर कायदा, नियम सर्वसामान्य नागरिक तरी कसे पाळतील, असा सवालही ऍड. चरण यांनी उपस्थित केला आहे. तसेच शहराच्या विविध भागात लावलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांवरही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्वरित कारवाई करावी.