पुणे-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुशिक्षित डॉक्टर, वकील अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोक आहेत. दरवेळी आमच्यावर दरोडेखोरांचा गुन्हा दाखल केला जातो. आम्ही गुंड आहोत, असे दाखविले जाते. आम्ही जर कानाखाली मारले असेल तर जी तरतूद कायद्यात असेल त्यानुसारच पुणे पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहराच्या महिला शहराध्यक्षा अॅड.रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली.
पुण्यातील सिनेमागृह चालकांनी आठ दिवसात खाद्यपदार्थांच्या किमती कमी कराव्यात आणि घरचे खाद्यपदार्थ सिनेमागृहात घेऊन जाण्यास परवानगी द्यावी. सिनेमागृहमालकांनी आठ दिवसात यावर निर्णय न घेतल्यास ‘मनसे स्टाईल’ने आंदोलन करण्याचा इशारा ठोंबरे यांनी दिला. रुपाली पाटील म्हणाल्या, पोलिसांना सिनेमागृहातील लुटीविषयी सांगितले असता ते म्हणतात, आमच्याकडे कायद्याची तरतूद नाही. जर पोलिसांकडे कायद्याची तरतूद नसेल, ते कारवाई करू शकत नसतील तर त्यांनी निदान आमच्यावर खोटे गुन्हे तरी दाखल करू नयेत. आम्ही जर कानाखाली मारले असेत तर कायद्यानुसार सरकारने, पुणे पोलिसांनी आमच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती रुपाली पाटील यांनी केली.