तिहेरी तलाकविरोधी कायद्यामुळे घटस्फोटीत मुस्लीम महिलांना न्याय मिळणार आहे. तथापि, महासत्ता होण्याचे स्वप्नरंजन करणारा आपला देश, या देशातील बहुतांश समाज हा प्रगतीपासून वंचित आहे. याचे कारण म्हणजे प्रत्येक समाजामध्ये असलेला सुधारणांचा अभाव, शिक्षणाचा अभाव, त्याचप्रमाणे समाजात असलेले मागासलेपण, वरील तिन्ही कारणांचा जाच पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त सहन करावा लागतो, पण भारतीय महिला या कमालीच्या सहनशील आहेत. सरंजामशाही वृत्ती आणि पुरुषप्रधान संस्कृती भारतीय समाजात मुळापर्यंत रुजलेल्या आहेत, अशा परिस्थितीत महिलांना आपल्या हक्कासाठी संघर्ष करावा लागला नाही, तर नवलच! संघर्ष हा भारतीय स्त्रीच्या पाचवीलाच पुजलेला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्तीठरणार नाही.
नुकताच सर्वोच्च न्यायालयाने मुस्लीम समाजातील तिहेरी तलाक पद्धत बेकायदेशीर ठरवत लाखो मुस्लीम महिलांची या नाहक भीतीतून सुटका केली. या तिहेरी तलाकामुळे पुन्हा एकदा बहुचर्चित शहाबानो प्रकरणाचे स्मरण झाले आहे. अर्थात एकीकडे केंद्र सरकारने कट्टरपंथीयांसमोर लोटांगण घातले होते, तर आता यावर कायद्याचा उपाय करण्यात आल्याचे दिसून येत आहे. मात्र, फक्त कायदा करून काहीही होणार नसून कुटुंबसंस्थेत सलोखा आवश्यक असल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाने तीन तलाक बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कृत्य ठरवणारा जो कायदा लोकसभेत पारित करून घेतला. त्या कायद्याचे बीजारोपण राजीव गांधी सरकार काळात झाले होते, असे म्हटल्यास त्यावर कोणाचा ही विश्वास बसणार नाही. मात्र, हेच सत्य आहे. शहाबानोप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शहाबानोला तिच्या पतीने (जो स्वत: वकील होता) दरमहा ठरावीक रक्कम पोटगी म्हणून द्यावी, असा निर्णय दिला होता. याबाबत तिचे पती आणि मुस्लीम समाजातील पुरुषांचे म्हणणे होते की, मुस्लीम वैयक्तिक कायद्यानुसार पती घटस्फोटीत पत्नीला फक्त ‘इद्दत’ काळाची (इद्दत काळ 3 महिन्यांचा असतो) पोटगी द्यायला बांधील असतो. राजीव गांधी सरकारने न्यायालयाचे निर्णय आणि मुस्लीम कायदे मंडळ यांचे मत लक्षात घेऊन मधला मार्ग निवडणारा कायदा केला. हा कायदा वादाच्या प्रचंड भोवर्यात सापडला होता. अल्पसंख्याक समाजासमोर केंद्र सरकार झुकल्याचा विरोधकांनी आरोप केला होता. काँग्रेस पक्षाला याची जबर राजकीय किंमत मोजावी लागली होती. आता केंद्रातील मोदी सरकारने नेमक्या याच प्रकरणावर मुस्लीम महिलांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केला. ही समाधानकारक बाब आहे. सध्या तरी तिहेरी तलाकविरोधी विधेयक हे राज्यसभेत अडकून पडल्याचे दिसून येत असून, याला कायद्याचे स्वरूप मिळण्यासाठी काही कालखंड जाऊ द्यावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. तथापि, या माध्यमातून एकंदरीतच कुटुंबातील विसंवादाचा मुद्दा जगासमोर आला आहे.
हे देखील वाचा
तिहेरी तलाकविरोधी कायद्यामुळे घटस्फोटीत मुस्लीम महिलांना न्याय मिळणार आहे. तथापि, महासत्ता होण्याचे स्वप्नरंजन करणारा आपला देश, या देशातील बहुतांश समाज हा प्रगतीपासून वंचित आहे. याचे कारण म्हणजे प्रत्येक समाजामध्ये असलेला सुधारणाचा अभाव, शिक्षणाचा अभाव, त्याचप्रमाणे समाजात असलेले मागासलेपण, वरील तिन्ही कारणांचा जाच पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त सहन करावा लागतो, पण भारतीय महिला या कमालीच्या सहनशील आहेत. सरंजामशाही वृत्ती आणि पुरुषप्रधान संस्कृती भारतीय समाजात मुळापर्यंत रुजलेल्या आहेत, अशा परिस्थितीत महिलांना आपल्या हक्कासाठी संघर्ष करावा लागला नाही, तर नवलच! संघर्ष हा भारतीय स्त्रीच्या पाचवीलाच पुजलेला आहे. असे म्हटल्या अतिशयोक्ती ठरणार नाही. शहाबानोप्रमाणेच आज मुस्लीमच नव्हे, तर सर्व समाजांमधील अनेक स्त्रिया संघर्ष करत आहेत. या महिलांची होणार्या घुसमटीस न्यायालयाने पूर्णविराम दिला असला, तरी विचार करणे गरजेचे आहे. वर-वर विचार केल्यास पती-पत्नीमध्ये होणारे भांडण-कलह घटस्फोटाला जबाबदार असल्याचे कळते. हे होण्याचे मुख्य कारण म्हणजे कमी होत चालेला ‘संवाद’ कोणत्याही नात्यात संवाद खुंटला की ते नातं संपल्यात जमा होते. आजच्या आधुनिक काळात संवादाची अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. मात्र, कुटुंबात होणार संवाद हरवला आहे. पती-पत्नी समाज माध्यमांवर ऑनलाइन वैयक्तिक जीवनात मात्र ऑफलाइन असतात.
प्रत्येक कुटुंबात थोडे फार वाद असतातच. मात्र, हे वाद किती गांभीर्याने घ्यावे हे ज्याने त्याने ठरवावे. कुटुंबात होणार्या वादांना अतिमहत्त्व देऊन कुटुंब कलह अनेकदा चव्हाट्यावर आणले जाते. या वादांना महत्त्व देऊन आपण आयुष्याचा खरा आनंद मिळवण्यात असमर्थ ठरत आहोत, याचा जरी विचार केला गेला तरी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील. यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे. कुटुंबात कमी होत असलेला संवाद आपणहून वाढवा. यामुळे शेवटची घटका मोजत असलेल्या नात्याला नवसंजीवनी मिळेल. पुढाकार महिलांनीच का घ्यावा, असा प्रश्न आपणास नक्कीच पडला असेल, याचे कारण म्हणजे भारतीय महिला या कमालीच्या सहनशील आणि समजूतदार आहेत. प्रेमळ आहेत म्हणून आपल्या नात्याला वाचवण्याच्या प्रयत्न आपणच करायला नको का? शेवटी सत्ता कोणत्याही पक्षाची असो, आपल्या घरात मात्र आपलीच सत्ता आहे. वादाची सुरुवात कोणीही केली असली, तरी शेवट मात्र आपणच करावी आणि शेवट आपण नक्कीच कराल, यात शंका नाही.
– मोनाली पालवे
मुक्त पत्रकार, जळगाव
मुक्त पत्रकार, जळगाव