धुळे । पोलिस कारवाईत जप्त केलेल्या तब्बल 10 लाखाच्या गुटखा आणि पानमसाल्याची परस्पर विल्हेवाट लावून वरीष्ठाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यातील चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यातील मुद्देमाल कारकून म्हणून नेमणुकीस असलेल्या एएसआय राजेंद्र आनंदराव शिरसाठ याच्या विरुध्द त्याच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सहा महिन्याच्या कालावधीत लावली विल्हेवाट
याप्रकरणी एपीआय जितेंद्र सपकाळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 20 एप्रिल 2017 ते 28 नोव्हेंबर 2017 दरम्यान येथील चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात मुद्देमाल कारकून म्हणून नेमणुकीस असलेले एएसआय राजेंद्र आनंदराव शिरसाठ याने आपल्या पदाचा गैरवापर करीत चाळीसगावरोड पोलिसांनी काही महिन्यांपुर्वी कारवाई करुन जप्त केलेल्या 10 लाख 36 हजार 600 रुपये किंमतीचा गुटखा पानमसाला या मालाची परस्पर विल्हेवाट लावून स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेण्यासाठी आपल्याच विभागातील लोकांची फसवणुक केली. विशेष म्हणजे चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात पकडलेल्या गुटखा पानमसाल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या संदर्भात तपास सुरु असून या कारवाईत पोलिसांनी 10 लाख 36 हजार 600 रुपये किंमतीचा आरएमटी गुटखा पान मसाला तसेच व्ही वन तंबाखू, विमल पान मसाला व इंडिया गोल्ड गुटखा याचा भला मोठा साठा जप्त केला होता. हा सर्व माल मुद्देमाल कारकून म्हणून एएसआय राजेंद्र शिरसाठ याच्या ताब्यात होता आणि तो सांभाळण्याची जबाबदारीही शिरसाठवरच होती. मात्र गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत राजेंद्र शिरसाठ याने या सर्वमालाची परस्पर विल्हेवाट लावली व शासनाची फसवणुक केली.