साक्री। पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागातील कारकून सुर्वे अत्यंत मनमानी करुन उर्मटपणे वागत आहे. तो कुणालाही जुमानत नाही.बीडीओ देखील त्याला पाठीशी घालत आहेत. ते महाशय फोन करुनही येत नाहीत. त्यांना घ्यायला गाडी पाठवावी लागते. तर मग हा कारकून आणि बीडीओ यांच्यात नेमके काय साटेलोटे आहे? असा घणाघाती आरोप पं. स. सदस्य उत्पल नांद्रे यांनी मासिक सभेच्या बैठकीत केला.
मासिक सभा वादळी
तर अन्य एक सदस्य माळवी यांनी एक ग्रामसेवक घरकूल मंजुरीच्या नावाने प्रत्येकी 2500 रुपये गोळा करत आहे. ते कुणाच्या सांगण्यावरुन याचा खुलासा व्हावा. अशी थेट मागणीच त्यांनी केली. त्यामुळे ही मासिक सभा चांगलीच वादळी ठरली आणि त्यातून साक्री पंचायत समितीच्या बारभाई कारभाराचेच मोठे वाभाडे काढले गेले. बीडीओ देखील कटपुतली झाल्याचे व त्यांचे प्रशासनावर दडपणच नसल्याचेही दिसून आले. त्यामुळे ही पंचायत समितीच बदनाम ठरली आहे. ह्याच वादळी सभेत प्रा. युवराज काकुस्ते यांनीही भाग घेऊन आपला संताप व्यक्त केला.
बंधार्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे
लघुसिंचन विभागामार्फत सुरु असलेल्या बंधार्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. त्या ठेकेदारावर कुणाचेही -कशाचेही नियंत्रण नाही. असा जाब त्यांनी लघुसिंचनच्या उपअभियंत्यांना विचारला, त्यावर उपअभियंता खैरनार यांनी आपली हतबलता व्यक्त केली. ठेकेदार तालुक्यातलेच असल्याने फार काही बोलता येत नाही. काम चुकीचे होत असेल तर ग्रामस्थांनीच काम बंद पाडून ठेकेदाराला हाकलून लावावे. असा हास्यापद खुलासा त्यांनी केला. यावरुन अधिकार्यांचेही पुढार्यांपुढे काही चालत नाही असे दिसून आले. अधिकारी मनमानी करत असल्याने पुढार्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. अधिकार्यांवर नियंत्रण नसल्याने असा प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. तसेच ठेकेदारांवर अंकुश नसल्याने निकृष्ठ दर्जाची कामे होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
ठेकेदाराला पैसे दिले गेल्याचा आरोप
राजकीय वरदहस्त असल्याशिवाय ठेकेदार मंडळी इतकी शेफारुच शकत नाहीत. हे ही त्यातूनच स्पष्ट झाले. क्लार्क, ठेकेदार, उपअभियंता, ग्रामसेवक, बीडीओ ह्या सर्वांच्याच कामाचे वाभाडे निघाल्यानंतर शिक्षक वर्गही त्याला अपवाद राहिला नाही. प्रा. युवराज काकुस्ते यांनी तालुक्यातील शाळा खोल्यांच्या अपूर्ण कामांचा प्रश्न मांडला. काम अपूर्ण असतांनाही ठेकेदाराला पैसे दिले गेल्याचा आरोप करीत त्यांनी चौकशीची मागणी केली. त्यावेळी काही कामचुकार शिक्षकांना कारणे दाखवा नोटीसा देण्यात आल्या असून त्यांची एक वेतनवाढ रोखण्याची शिफारस करण्यात आल्याचे शिक्षण विभागातील बी. बी. भील यांनी सांगितले.