कारने 20 फुटापर्यंत वृध्दास नेले फरफटत

0

जळगाव। कार शिकत असलेल्या महिलेचे कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याचा बाजुला फुल विक्री करणार्‍या वृध्द विक्रेत्याला 20 फुटापर्यंत फरफटत नेल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे ते आठ वाजेच्या सुमारास घडली. यात फुले विके्रता रमेश भिका बारी उर्फ फुसे (वय 60 रा.भैरव नगर, पिंप्राळा, जळगाव) हे गंभीर जमखी झाले आहेत. दरम्यान, कार मागे घेता येत नसल्याने बारी यांच्या छातीवर तब्बल दहा मिनिटे कार होती. ही घटना पाहून हादरलेल्या रिक्षा चालकांना तातडीने घटनास्थळी धाव घेवून कार हाताने उचलून बाहेर काढली.

थरारक प्रसंग पाहून रिक्षा चालकांची घटनास्थळी धाव
या घटनेची आपबिती रमेश बारी यांनी सांगितली. त्यांच्याच शब्दात वृत्त देत आहोत. रमेश बारी व मुलगा बापु बारी हे दोघं जण दररोज गणेश कॉलनी चौकात फुल विक्री करतात. मंगळवारी नेहमी प्रमाणे रमेश बारी हे रस्त्याच्याकडेला बसले तर मुलगा बापू हा गोलाणी मार्केटमध्ये फुल घेण्यासाठी गेला होता. खाली मान टाकून फुल निवडत असताना अचानकपणे भरधाव वेगाने कार आली व बारी यांनी 20 फुटापर्यंत फरफटत नेले. पुढे संकुलाच्या ओट्याजवळ कार थांबली, मात्र ही कार बारी यांच्या अंगावर होती. कार चालक महिला जयश्री तुळशीराम महाजन (रा.कोर्टाच्या मागे,जळगाव) या कार मागे घेण्याचा प्रयत्न करीत होत्या,परंतु कार मागे घेतली जात नव्हती तर दुसरीकडे बारी त्यात अडकल्याने त्यांचा जीव जात होता. हा थरारक प्रसंग पाहून चौकात थांबलेल्या रिक्षा चालकांनी घटनास्थळी धाव घेतली. कार उचलून बारी यांना बाहेर काढले व तातडीने खासगी दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर बारी यांना दुसजया दवाखान्यात दाखल करण्यात आले.