कारवाई केलेल्या हातगाडीधारकांच्या पुनर्वसनसाठी बेमुदत चक्री उपोषण

0

खडकी : पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी कारवाई केलेल्या हातगाडीधारकांचा पुर्नवसनाचा प्रश्न अद्याप मार्गी न लावल्याने संतप्त हातगाडीधारकांच्या वतीने खडकी कॅन्टोन्मेंट कार्यालय प्रवेशद्वारासमोर सोमवारपासून बेमुदत चक्री उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले. आंदोलनाचा दुसरा दिवस असुन अद्याप कॅन्टोन्मेंट प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

वाहतुक कोंडीचा जटील प्रश्न दुर करण्याकरीता खडकी कॅन्टोन्मेंट व खडकी पोलिसांच्या वतीने वाहतुकीला अडथळा ठरणारे बेकायदेशीर हातगाडीधारक व पथारी व्यवसायिकांवर मागील चार महिन्यापुर्वी कारवाईची मोहीम राबविण्यात आली.

पुनर्वसनबाबत कोणताच तोडगा नाही
या कारवाई अंतर्गत शेकडो हातगाडीधारकांवर उपासमारीची वेळ आली. कॅन्टोन्मेंट सदस्य मनीष आनंद यांनी मागील बोर्ड सभेत या गंभार प्रश्नी हातगाडीधारकांच्या पुनर्वसन संदर्भात तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती. कॅन्टोन्मेंट अध्यक्ष ब्रि. धीरज मोहन व सीईओ. अमोल जगताप यांनी या संबंधी विशेष सभा बोलावून त्यात सर्वानुमते निर्णय घेऊ असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र अद्याप हातगाडीधारकांच्या पुनर्वसन बाबत कुठलाच तोडगा व निर्णय न घेतल्याने संतप्त हातगाडीधाराकांच्या वतीने बेमुदत चक्री उपोषण आंदोलनास प्रारंभ करण्यात आला.

सदर प्रश्न आपल्या अखत्यारित येत नाही
खडकी बाजार गोल मार्केट व स्क्वेअर मार्केट संघटनेच्या वतीने कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. संघटनेचे रफिक कुरेशी अमिर शेख, बंडू चव्हाण, सदाशिव कांबळे, निसार खान, मंदा लोंढे, रोजी मेरी, रेखा कांबळे, रशिदा शेख, रेखा खरात, नयिमा खान, रंजना कांबळे, इरफान सय्यद आदी हातागाडीधारकांनी आंदोलनात सहभाग घेतला. सीईओ. जगताप यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन सदर प्रश्न आपल्या अखत्यारित नसून यासंबंधी बोर्ड सभेत सर्व अधिकारी व सदस्य याच्या समोर हा प्रश्न मांडून त्या संबंधी निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. मात्र या आश्वासनाने आंदोलनकर्त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी आपले आंदोलन पुर्ववत सुरुच ठेवले.

लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेणार
कारवाई केलेल्या हातगाडीधारकांच्या पुर्नवसन संदर्भात जो पर्यंत काँँन्टोन्मेंट प्रशासन लेखी स्वारुपात ठोस आश्वासन देत नाही तो पर्यत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे आंदोलनकर्ते रफिक कुरेशी आशिश सरोदे,मंदा लोंढे आदीनी या वेळी इशारा देताना सांगितले. पुर्नवसन प्रकीया राबवली जाईपर्यत हातगाडीधारकांना व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी ही या वेळी आंदोलनकर्त्यांच्या वतिने करण्यात आली.