कारागृह असो की कारागृहाच्या बाहेर …महिला असुरक्षितच….!

0

मुंबई : कारागृहातील महिला अधिकाऱ्यांचे लैंगिक शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांच्याकडे अशा पद्धतीचे पत्र आले असून या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी त्यांनीही हीच मागणी केली आहे. त्यामुळे राज्यातील महिला बाहेरही सुरक्षित नाहीत त्याच बरोबर त्या कारागृहातही सुरक्षित नसल्याचंही आता स्पष्ट झालं आहे. या संपूर्ण प्रकरणाची तातडीनं चौकशी करून संबधितावर कारवाई करावी अशी मागणी नीलम गोऱ्हे आणि चित्रा वाघ यांनी केली आहे.

एका कारागृह महिला निरिक्षकांनीच असा प्रकार घडत असल्याचं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहीलं आहे. त्याची एक प्रत चित्रा वाघ आणि नीलम गोऱ्हे यांना प्राप्त झाली आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. जवळपास ६० पेक्षा जास्त महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण होत असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. ही घटना मुख्यमंत्र्यांच्या विदर्भातील एका जिल्हा कारागृहात घडली आहे. या पत्रात कारागृह विभागातील काही बड्या अधिकाऱ्यांविषयी संशयास्पद व धक्कादायक बाबी नमूद केल्या गेल्या आहेत अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली. पावसाळी अधिवेश्नाअत पक्षाचे नेते नक्कीच या प्रकरणाविरोधात आवाज उठवतील असे त्या म्हणाल्या.

या पत्राची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला असता, असे पत्र मी पाठविलेच नाही असे पत्र लिहिणा-या अधिकारी महिलेचे म्हणणे आहे. या पत्राची शहानिशा करून यातील सर्व बाबी पडताळणे अतिशय आवश्यक आहे असे मला वाटते. असे गोऱ्हे यांनी सांगितले आहे. पत्रात नाव असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही मला ताबडतोब दूरध्वनीवरून संपर्क करून भेटीची वेळ मागितली आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांनाही मी निवेदनाद्वारे कळविले आहे. आपल्याकडून याबाबत उचित कार्यवाहीसाठी हे पत्र ज्या लिफाफ्यातून आले त्याच्या छायांकित प्रत देखील सोबत पाठविली असल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

पत्रात लिहिल्याप्रमाणे कारागृह अधीक्षक आणि धिकारी ६० ते ७० महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवायचे. शिवाय या पत्र लिहिलेल्या महिले प्रमाणे अनेक महिला आहेत त्यांच्यावर त्यांनी बलात्कार केला आहे व अजूनही सुरूच आहे. ही एक अत्यंत गंभीर बाब असून याचा छडा लावणे गरजेचे आहे.
नीलम गोऱ्हे, शिवसेना नेत्या व प्रवक्त्या

कारागृह विभागातील काही बड्या अधिकाऱ्यांविषयी संशयास्पद व धक्कादायक बाबी नमूद केल्या गेल्या आहेत. हे जर असे असेल तर अतिशय गंभीर प्रकार चव्हाट्यावर येत असून महिला सुरक्षिततेचे वाभाडे काढले जात आहेत. या प्रकरणाने महिलांच्या सुरक्षिततेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.
चित्रा वाघ, अध्यक्षा, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस.