पहिली पत्नी असतानाही दुसरा विवाह ; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा
भुसावळ- पहिले लग्न झाले असतानाही दुसरे लग्न केल्याप्रकरणी व कार्पोरेशन बँकेत मॅनेजर असल्याचे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी तसेच मूलबाळ न झाल्याने व माहेरून 25 लाख रुपये न आणल्याने वाडेगाव, जि.अकोला येथील रहिवासी व भुसावळातील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
25 लाखांसाठी कुटुंबियांकडून छळ
दीपा धीरज राठोड (28, खडका रोड, महालक्ष्मी मंदिराजवळ, भुसावळ) या विवाहितेने बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार 29 नोव्हेंबर 2012 रोजी त्यांचे वाडेगाव, जि.अकोला येथे धीरज राठोड यांच्यासोबत लग्न झाले होते. लग्न ठरण्यापूर्वी मुलगा कार्पोरेशन बँकेत मॅनेजर असल्याचे राठोड कुटुंबियांनी सांगितले होते तर लग्नाच्या सहा महिन्यांनी मात्र पती मॅनेजर नसल्याचे उघड झाल्यानंतर सासरच्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली तसेच माहेरून फ्रिज व सोफा न आणल्याने छळ करण्यात आला. या काळात आपली आई मृत झाल्याने कुणालाही हा त्रास सांगितला नाही मात्र लग्नाच्या अडीच वर्षानंतर पती घरी परतले व आपल्याला ब्रेन ट्युमर झाल्याचे त्यांनी सांगत सहा महिने सुटीवर असल्याचे सांगितले मात्र ते नोकरीवर जात नसल्याने नंतर त्यांनी नोकरी सोडल्याचे सांगितले व स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून 25 लाखांची मागणी करण्यात आली व मागणी पूर्ण न केल्याने छळ करण्यात आला.
पहिली पत्नी असतानाही दुसरे लग्न
विवाहितेच्या तक्रारीनुसार, पती धीरज हे दररोज रात्री कुठेतरी निघून जात असल्याने आपल्याला संशय आला व त्यांचा मोबाईल मागितल्यानंतर तो त्यांनी न दिल्याने आपल्याला आपल्या पतीचे अफसाना नावाच्या तरुणीशी लग्न झाल्याचे व त्यांच्यापासून तिला एक मुलगाही असल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, पाचही आरोपींनी विवाहितेला मूलबाळ होत नसल्याने, माहेरून सोफा, फ्रिज, सोफासेट व सोन्याचे दागिने न आणल्याने तसेच पहिली पत्नी असताना दुसरा विवाह केल्याने पती धीरज नंदकिशोर राठोड, सासु आशा नंदकिशोर राठोड, मोठे सासरे दिलीप हनुमानदास राठोड, दीर निरज नंदकिशोर राठोड (सर्व रा.खडका रोड, महालक्ष्मी मंदिराजवळ, भुसावळ), नणंद अर्चना अतुल नारडीया (बुलढाणा) यांच्याविरुद्ध बाजारपेठ गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहेत.