प्रचाराच्या वेळी भोजन, नाश्त्याचे होणार व्हिडिओ शूटिंग ; सोशल मिडीयावरील पोस्टवरही निवडणूक अधिकार्यांचे बारकाईने लक्ष
फैजपूर- रावेर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आपण राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना गैर प्रकारावर लक्ष देण्यासाठी पथक तयार करण्यात आले. गैर प्रकार होत असल्यास विशेष पथक त्याचे थेट व्हिडीओ शुट करणार असून उमेदवारांच्या प्रत्येक खर्चावर बारीक लक्ष ठेवायला हवे, अशा सूचना रावेर लोकसभा निवडणूक खर्च निरीक्षक मधुकर आनंद यांनी येथे दिल्या. शहरातल जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित विशेष पथकाच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले.
निवडणूक कर्मचार्यांना मार्गदर्शन
रावेर लोकसभा मतदार क्षेत्र सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया वेगाने होत असून निवडणूक कर्मचारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे. याच ठिकाणी निवडणूक खर्च निरीक्षक एम आनंद यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. या प्रसंगी एम.आंनद यांनी सर्व निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी हितगुज करतांना सांगितले की, लोकशाही बळकट करणारी सार्वत्रिक निवडणूक ही निकोप आणि पारदर्शक व्हावी यासाठी सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. उमेदवार आणि त्यांच्या प्रचारासाठी आलेले प्रचारक व कार्यकर्ते यांच्या सभा, प्रचार फेरी यांचे चित्रीकरण कसे करावे त्याचे सविस्तर विवरण त्यांनी स्पष्ट केले.
खर्चावर बारीक लक्ष ठेवा
उमेदवार यांच्या प्रत्येक खर्चावर आपले व्हिडीओ चित्रीकरण होणे आवश्यक आहे यासाठी व्हिडीओ संनियंत्रण पथकांनी सज्ज राहणे आवश्यक आहे. तसेच स्थिर संनियंत्रण पथक यांनी इंटेलिजन्स शेअरींगचे काम करावे. निवडणुकीत प्रत्येक उमेदवार करीत असलेला खर्च व पुढील कालावधीत होणार्या खर्चाच्या हिशोबाबद्दल सहाय्यक खर्च निरीक्षक, व्हिडीओ संनिरिक्षक चमू, व्हिडीओ पाहणारा चमू, रेखांकन चमू, भरारी पथके तसेच स्थिर निरीण चमू या सर्वांना मार्गदर्शन करून उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यकता भासल्यास कडक कारवाई करण्याबाबत सूचनादेखील मधुकर आनंद यांनी दिल्या. प्रसंगी कामासाठी नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे मनोगत व समस्या जाणून घेतल्या. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व जबाबदारी याचीही जाणीव करून देतांनाच कर्तव्यात कसूर करणार्यांवर कारवाई करण्यात येईल हा देखील इशारा त्यांनी दिला. आनंद यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारासोबत असलेले वाहन, प्रचाराच्या वेळी भोजन, नाश्ता याची व्हिडिओ शूटिंग व पेड न्यूज वर बारीक लक्ष ठेवा.
यांची होती उपस्थिती
सहा.निवडणूक अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्याकडून रावेर विधानसभा क्षेत्रामधील आढावा घेऊन येथील कामकाज पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सहा निवडणूक खर्च निरीक्षक संजीत कुमार, रावेर तहसीलदार अभिलाषा देवगुणे, यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्यासह सर्व पथके उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनो घरून करून या जेवण
लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी कार्यकर्त्यांना जेवणाचे व पैशाचे आमिष दिले जाते. त्याशिवाय कुणीही प्रचाराला येत नाही मात्र यावेळी निवडणूक आयोगाने त्या कार्यकर्त्यांच्या जेवणावर निर्बंध आणत प्रचारादरम्यान जेवणाचा खर्च हा उमेदवार यांच्या खर्चात पडणार असल्याचे सांगितल्याने राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सकाळी जेवण करूनच प्रचाराला जावे लागणार आहे.