कार्यक्रमांनिमित्त रस्त्यावर उभारण्यात येणार्‍या लाकडी कमानीचा वाहतुकीला अडथळा

0

कल्याण । उत्सव आणि कार्यक्रमांनिमित्त रस्त्यावर उभारण्यात येणार्‍या स्वागत कमानी वाहतुकीला अडथळा ठरण्यासह नागरिकांच्या जीवावर बेतण्याची देखील भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या कमानी सण-उत्सव पार पडल्यानंतरही महिनोन्महिने रस्त्यावर तशाच ठेवल्या जात असल्याने या कमानी काढून टाकण्याकडे महापालिका प्रशासन आणि वाहतूक शाखेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे. मोहोने गेट येथे रस्त्यावर जानेवारी महिन्याच्या प्रारंभी एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त स्वागत कमान उभारण्यात आली होती. त्याला दोन महिने होत आले तरी सदर कमान रस्त्यावर तशीच ठेवण्यात आल्याचे दिसून येते. हा परिसर नेहेमी गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो.

येथेच दोन रिक्षा थांब्यांसह महापालिका परीवहनचा (केडीएमटी) थांबा आहे. येथेच छ. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके आहेत. सकाळ-सायंकाळ येथे फार वर्दळ असल्याने सातत्याने वाहतूककोंडीदेखील होत असते. या वर्दळीतच शिवाजी महाराजांचे स्मारक आणि केडीएमटीच्या थांब्याजवळ उभारलेली ही लाकडी कमान अडीच आलेली नाही. येथील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी वारंवार मोहोने परिसरात येणारे फेरीवाला हटाव पथकाच्या कर्मचार्‍यांना ही कमान का दिसत नाही, असा प्रश्‍न मोहोनेवासियांना पडला आहे. गतवर्षी गणेशोत्सवात कल्याणमधील शिवाजी चौकात महापालिका मुख्यालयाकडे जाणार्‍या रस्त्याच्या सुरुवातीला गणेशोत्सवानिमित्त लाकडी स्वागत कमान उभारण्यात आली होती. त्यानंतर चारच दिवसांत या कमानीचा रस्त्याच्या बाजूचा वरील लाकडी भाग तुटून खाली पडला. तो बाजूला पडल्याने कुणाच्या विशेष लक्षात आलेले नसले तरी हा प्रकार रस्त्याच्या मध्यभागाचा कमानीचा वरील भाग तुटून खालून जाणार्‍या वाहनावर वा पादचार्‍यावर पडला असता तर एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. त्या घटनेमुळेच शहरात रस्तोरस्ती उभारण्यात येणार्‍या कमानी आणि जाहिरातींचे फलक नागरिकांच्या जीवावर बेतण्याचा धोका दिसून येत आहे.

गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, ईद-मोहरम, दहीहंडी त्याचप्रमाणे विविध महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी साठी स्टेज, मंडप, कमानी उभारल्या जातात. त्यासाठी रीतसर महापालिकेकडून परवानगी घेण्याची आवश्यकता असते. काही वेळा वाहतुकीच्या रस्त्यात मंडप-कमानी उभारल्या जातात. त्यामुळे नागरिकांना व रहदारीला अडथळा होत असतो. अशाच संदर्भात डॉ. महेश बेडेकर यांनी महाराष्ट्र शासन व इतर यांच्या विरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका क्र. 173/2010 दाखल केली होती. सदर याचिकेवरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने विविध उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी मंडप, स्टेज, कमानी उभारण्यासाठी परवानगी देण्याबाबत सविस्तर कार्यपद्धती तयार केली. त्यानुसार सबंधित अर्जदारांना सण-उत्सवानिमित्त स्टेज, मंडप, कमानींना परवानगी दिल्या जातात. विशेष म्हणजे या कमानी सण-उत्सव पार पडल्यानंतरही काढून न टाकता महिनोन्महिने रस्त्यावर तशाच ठेवल्या जात असल्याने या कमानी काढून टाकण्याकडे महापालिका प्रशासन आणि वाहतूक शाखेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे.