जळगाव। पंचायत समिती कार्यालयात तालुक्यातील नागरिक आपल्या समस्या व योजनांची माहिती घेण्यासाठी येत असतात. मात्र पंचायत समिती कार्यालयात एकही अधिकारी जागेवर उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या समस्या मार्गी लागत नाही. पंचायत समितीचा कारभार सध्या ‘कोंबडी बाजार’ सारखा झाला असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्यांनी केला.
पंचायत समितीच्या मासीक सभेचे आयोजन बुधवारी कार्यलयात करण्यात आले होते. सभेत सभापती यमुना रोटे, उपसभापती शितल पाटील, गट विकास अधिकारी डी.एस.चित्ते, सदस्य अॅड.हर्षल चौधरी, नंदलाल पाटील, ज्योती महाजन, निर्मला कोळी, विमल बागुल, संगिता चिंचोरे आदी उपस्थित होते. सभेत प्रधानमंत्री आवास योजना, शौचालय बांधणीचे उदिष्ट या विषयांवर चर्चा करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणार्या प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, शबरी घरकुल योजनेतील 2009 ते 2015 या काळातील अनेक कामे अद्याप अपुर्ण आहेत. जिल्ह्यातील इतर पंचायत समिती कार्यालयाच्या तूलनेत जळगाव पंचायत समिती मागे असल्याने अनेक लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळत नसल्याची तक्रार अॅड.चौधरी व शितल पाटील यांनी केली.