छापा घालून परतणार्‍या आयटीच्या अधिकार्‍यावर काळाचा घाला

0

भरधाव तवेरा कंटेनरवर धडकली, एक अधिकारी ठार, दोघे गंभीर
लोणावळा/देहूरोड : तळेगाव येथील एका उद्योग कंपनीवर छापा घालून व तपास मोहीम संपवून पुण्याकडे परतणार्‍या प्राप्तिकर खात्याच्या अधिकार्‍यावर गुरुवारी काळाने घाला घातला. अधिकार्‍यांना घेऊन येणारी भरधाव तवेरा गाडी लोखंडवाहू कंटेनरवर पाठीमागून धडकली. या भीषण अपघातात एक अधिकारी ठार तर दोघे गंभीर जखमी झालेत. जखमींना सुरुवातीला सोमाटणे फाटा, नंतर हिंजवडी व नंतर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अमरजाईनजीक हा भीषण अपघात घडला. अभिषेक त्यागी (वय 28) असे मृत अधिकार्‍याचे नाव असून, ते नवीनच प्राप्तिकर खात्यात रुजू झाले होते.

दोन अधिकार्‍यांची प्रकृती चिंताजनक
तळेगाव येथील एका स्थानिक उद्योगावर गुरुवारी सकाळी प्राप्तिकर खात्याच्या अधिकार्‍यांनी छापा टाकला होता. त्यात 12 तपास अधिकारी सहभागी झाले होते. हा तपास संपवून आणि काही दस्तावेज सोबत घेऊन या अधिकार्‍यांच्या दोन गाड्या तळेगावहून पुण्याकडे परत येत होत्या. त्यापैकी एक तवेरा गाडी भरधाव असल्याने महामार्गावर उभ्या असलेल्या लोखंडवाहू कंटेनरवर धडकली. हा अपघात इतका भीषण होता, की त्यांच्या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. गुरुवारी सकाळच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे काहीकाळ वाहतूकही ठप्प पडली होती. या अपघातात अभिषेक त्यागी हे तरुण प्राप्तिकर अधिकारी जागीच ठार झाले तर आनंद उपाध्याय व के. के. मिश्रा हे दोन अधिकारी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सोमाटणे फाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खूपच चिंताजनक असल्याने या दोघांनाही पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे हलविण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर अतिवदक्षता कक्षात उपचार सुरु होते.

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घडला अपघात
महामार्गावर चक्काजाम झाल्याने अचानक हा कंटेनर बंद अवस्थेत थांबला होता. तर खासगी तवेरा गाडीतून प्राप्तिकर खात्याचे तीन अधिकारी व चालक हे पुण्याच्या दिशेने जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती सरळ कंटेनरवर जाऊन आदळली. यामध्ये समोरच्या सीटवर बसलेल्या त्यागी यांचा जागीच मृत्यू झाला. तर मिश्रा व उपाध्याय हे गंभीर जखमी झाले. चालकाला मात्र काहीही हानी झाली नाही. अपघातानंतर देहूरोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवपरीक्षणासाठी पाठविण्यात आला होता. मयत अभिषेक त्यागी हे केमिकल इंजिनिअर होते. त्यांचे शिक्षण थापर विद्यापीठ पाटियाला येथून झाले होते. ऑक्टोबर 2014 मध्ये त्यांची भारतीय प्राप्तिकर खात्यात मुंबई येथे नियुक्ती झाली होती. फेब्रुवारी 2017 मध्ये त्यांची पुण्यात बदली झाली होती.