कालवाग्रस्तांकडे प्रशासनाने फिरवली पाठ

0

रस्त्यावर चूल मांडून आंदोलनाचा इशारा

पुणे : मुठा कालवा फुटून दांडेकर पूल वसाहतीमधील तब्बल 700 हून अधिक घरांत पाणी घुसले, तर 98 घरे वाहून गेली. नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीची बाब म्हणून आवश्यक असलेली मदत अद्यापही मिळत नसल्याने कालवाग्रस्तांनी आता प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याची पूर्ण घरे वाहून गेली आहेत. त्यांना घर न मिळाल्यास सोमवारपासून नालंदा बुद्ध विहार ते कालवा फुटलेल्या भिंतीपर्यंत सुमारे 100 ते 250 कुटुंबे रस्त्याच्या कडेला चूल पेटविणार आहेत.

दुघर्टना घडून 10 दिवस झाले, तरी त्यांना फक्त 10 किलो गहू आणि तांदूळ देऊन शासकीय यंत्रणांनी त्यांच्याकडे पाठ फिरविली आहे. ‘आठ दिवसांपासून मदतीचे कोटी रुपयांचे आकडेच ऐकायला मिळत आहेत. आम्हांला मदत कधी मिळणार, असा सवाल ते करत आहेत.

दांडेकर पूल परिसरातील घर वाहून गेलेली 98 कुटुंबे घर बांधण्यासाठी शासन मदत करेल, या आशेवर अजूनही आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठांना सोबत घेऊन उघड्यावरच संसार सुरू आहे. नेते आणि अधिकार्‍यांनीही फिरकने बंदच केल्याने त्यांना मदतीसाठी शासकीय कार्यालयांची पायरी झिजविण्याची वेळ आली आहे. या नागरिकांना रेशनिंगवर देण्यात आला गहू आणि तांदूळही निकृष्ट असल्याच्या तक्रारी महिलांनी केल्या आहेत.

ज्याची घरे पूर्णपणे वाहून गेली आहेत. त्यांना आठ दिवसांपासून उघड्यावर राहावे लागत आहे. अशा स्थितीत त्यांना तातडीने घरे मिळावी ही प्रमुख मागणी असून ज्यांच्या घरात पाणी घुसले आहे त्यांनाही तातडीने मदत मिळावी अशी मागणीही केली आहे. काही दिवस महापालिका, स्वयंसेवी संस्था तसेच नगरसेवकाकडून नाश्ता, पाणी जेवण दिले जात होते; मात्र आता तेसुद्धा बंद झाले आहे. तर घरात काही करायचे झाल्यास ना भांडी आहेत ना गॅस त्यामुळे नागरिकाची सहनशीलता संपली असून आता प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.