हडपसर (अनिल मोरे) । हडपसरजवळ चार कचरा प्रकल्प असताना कचराकुंडी अभावी ठिकठिकाणी कचर्याचे ढीग साचले असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, महापालिकेच्या कर्मचारी जीव धोक्यात घालून कचर्याची विल्हेवाट लावत आहेत. बेशिस्त नागरिकांवर अंकुश ठेवण्यात पालिकेला अपयश आले आहे.
हडपसर परिसरातून दोन कालवे वाहत आहेत. कालव्यामधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू नसल्याने या कालव्याच्या वापर नागरिक कचरा टाकण्यासाठी करत आहेत. पालिकेने कचराकुंड्या हलविल्या, त्यातच कचरा संकलित करणार्या गाड्या व कर्मचार्यांना मर्यादा असल्याने संपूर्ण कचरा संकलित केला जात नाही. त्यामुळे नागरिक कचरा कालव्याच्या कडेला अथवा कालव्यात टाकण्यात धन्यता मानतात. याचा परिणाम कालव्याच्या कडेला जागोजागी कचर्याचे ढीग साचलेले दिसतात. या कचर्यामुळे डास, माशांचे प्रमाण वाढले आहे, दुर्गंधी पसरली आहे. याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. साथीच्या रोगांचे प्रमाण वाढत असून दवाखान्यांमध्ये अशा रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे, यामध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे.
बेकायदेशीरपणे रस्त्यावर व कालव्यात कचरा टाकणार्यांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. पालिकेचे कर्मचारी जेव्हा जागेवर हजर असतात तेव्हा नावे लिहून त्यांना कारवाईच्या नोटिसा पाठविल्या जातात. या नोटिसांनंतर कोर्टात दंडात्मक कारवाई होते, पण अशा बेशिस्त नागरिकांवर अंकुश कसा ठेवणार असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
जीव धोक्यात घालून कचर्याची स्वच्छता
डवरीनगर, शांतीसागर, जिजामाता वसाहत, गाडीतळ, वेताळबाबा वसाहत जवळ कालव्यावर कचर्याचे ढीग आहेत. पालिका कर्मचार्यांना हा कचरा साफ करणे जिकिरीचे बनले आहे. कर्मचारी जीव धोक्यात घालून सफाई करीत असतात. कालव्याच्या पुलावर उभा राहून कचरा काढताना तोल जाऊन पडल्यास कामगारांचा जीव जाऊ शकतो, याकडे पालिका प्रशासन लक्ष देईल का?
– बाळासाहेब जाधव
अध्यक्ष, वसंतराव जाधव फाउंडेशन