काश्मिरी जनतेला सैन्य आणि दहशतवादी दोघेही मारतात

0

नवी दिल्ली। काश्मीर प्रकरणी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वेळी त्यांनी थेट भारतीय लष्कराला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. काश्मिरी लोकांना एका बाजूने दहशतवादी मारतात, तर दुसरीकडून भारतीय लष्कराचे जवान. दिग्विजय सिंह यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भारतीय लष्करावर आरोप करून दिग्विजय सिंह यांना नेमके काय साध्य करायचे आहे, असा सवाल विचारला जात आहे. भारतीय लष्करावर आरोप करताना त्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना काश्मिरी गुंडांकडून होत असलेल्या हाणामारीच्या व्हिडिओकडेही दुर्लक्ष केले आहे. सीआरपीएफच्या जवानाला जेव्हा मारण्यात येत होते. तेव्हा त्याच्या हातात हत्यार होते. पण तरीही त्याने त्या हत्याराचा वापर न करता, संयम दाखवत जमावाकडून मार खाल्ला होता, तरीही दिग्विजय सिंह यांच्या या भूमिकेमुळे आश्‍चर्य व संतापही व्यक्त करण्यात येत आहे.

युद्धाची भीती
दिग्विजय सिंह यांनी भारतीय लष्करावर आरोप केले. परंतु, दगडफेक करणार्‍यांविरोधात, खुलेआम भारतविरोधात घोषणा देणार्‍या व लष्करावर हल्ला करणार्‍यांबाबत त्यांनी काहीच भाष्य केले नाही. मोदी सरकारच्या काश्मीरनीतीवर त्यांनी शंका व्यक्त करत पाकिस्तानविरूद्ध युद्धाचीही भीतीही व्यक्त केली.

युवकाचा ढालीसारखा वापर
दोन दिवसांपूर्वी एका व्हिडिओत लष्कराच्या जीपवर हातपाय बांधलेल्या एका काश्मिरी युवकाचा व्हिडिओ समोर आला आहे. तो व्हिडिओ पाहून जर दिग्विजय सिंह यांनी हे आरोप केले असतील तर हे पूर्ण जाणून न घेता त्यांनी केलेले वक्तव्य असेल, असे सांगण्यात येते. कारण लष्कराने दगडफेक करणार्‍यांपासून बचावासाठी त्या युवकाचा ढालीसारखा उपयोग केला होता. नंतर त्या युवकाला सुरक्षित सोडण्यात आले.