काश्मिरी फुटीरवादी यासीन मलिकला अटक

0

श्रीनगर। फुटीरवादी जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अध्यक्ष यासीन मलिक याला रविवारी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यासीन मलिक याला श्रीनगरमध्ये लाल चौकीजवळील माईसुमा येथील त्याच्या राहत्या घरातून रविवारी सकाळी अटक करण्यात आली असून त्याका श्रीनगरमधील मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आल्याची महिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली. दरम्यान राष्ट्रीय तपास पथकाने दोघा फुटीरवादी नेत्यांना चौकशीसाठी दिल्लीत येण्याचे समन्स बजावले आहे. या दोघांवर दहशतवादी कारावायांसाठी पैसे गोळा केल्याचा आरोप आहे.

यासीन मलिक यांनी काल पुलवामा जिल्ह्यात हिजबूल मुजाहिदीनच्या सबझार अहमद भट आणि फैझज मुजफ्फर या दोन दहशतवाद्यांच्या निवासांना भेट दिली होती. हे दोन्ही दहशतवादी सुरक्षा दलाबरोबर शनीवारी झालेल्या चकमकीत मारले गेले आहेत. यासीन मलिक आणि हुरियत कॉन्फरन्सच्या दोन्ही गटांचे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी आणि मिरवैझ उमर फारूख यांनी मिळून दोन दहशतवाद्यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ दोन दिवसांचा बंद घोषीत केला आहे. आंदोलकांविरुद्ध चालविलेल्या क्रूर बळाच्या वापराचाही त्यांनी निषेध केला आहे. दोन्ही दहशतवाद्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या तिघांनी ट्राल येथे मंगळवारी पदयात्रा काढण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने तहरिक ए हुरियतच्या फारुक अहमद दार आणि जावेद अहमद बाबा यांना बँक खात्यांचा तपशील आणि मालमत्तेची कागदपत्रे घेऊन दिल्लीत बोलावले आहे.