श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान हंदवाडात झालेल्या चकमकीत कर्नल, मेजरसह ५ जवान शहीद झाले आहेत. यात जम्मू-काश्मीर पोलीस दलातील उपनिरीक्षकाचाही समावेश आहे. तर दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आले आहे. शहीद जवानांमध्ये कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील उपनिरीक्षक शकील काझी यांचा समावेश आहे.
भारतीय लष्कराच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंजमुल्ला भागात एका घरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. दहशतवाद्यांनी काही नागरिकांनाही ओलीस ठेवले होते. दहशतवाद्यांचा बिमोड करुन नागरिकांची सुखरूप सुटका करण्यासाठी भारतीय लष्कराने मोहिम आखली होती. याचे नेतृत्व कर्नल आशुतोष शर्मा करत होते, यात दहशतवादी आणि लष्करामध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. यात २१ राष्ट्रीय रायफल्स तुकडीचे कर्नल आणि मेजर यांना आपला जीव गमावावा लागला. त्यांच्यासोबत आणखी तीन जवानही यात शहीद झाले. यात जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एका अधिकार्याचाही समावेश आहे. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचा बिमोड करुन ओलीस असलेल्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे.