काश्मीरमध्ये हुरियत नेते सैयद गिलानींवर गुन्हा दाखल

0

श्रीनगर । राष्ट्रीय तपास यंत्रणेने काश्मीरमध्ये अराजकता माजवण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाकडून पैसे घेतल्याच्या आरोपावरून काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सैयद अली शाह गिलानी आणि हुर्रियत कॉन्फरंसच्या अन्य नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एक पथक श्रीनगरमध्ये आले असून या पथकाने गिलानी यांच्यासह हुर्रियतचे विभागीय अध्यक्ष नईम खान, जेकेएलएफचा नेता फारूक अहमद दार उर्फ बिट्टा कराटे आणि तहरिक ए हुर्रियतच्या जावेदा बाबा यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये काश्मिरी युवकांना दगडफेक करण्यासाठी पैसे पुरवणार्‍या व्यक्तीचा पर्दाफाश केला आहे. हुर्रियत कॉन्फरंसमधील गिलानी गटाचा विभागीय अध्यक्ष नईम खान याला दगडफेक करणार्‍यांसाठी आयएसआय, लश्कर-ए-तोयबा सारख्या संघटनाकडून पैसे घेतल्याची कबुली दिल्याचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. हे स्टिंग ऑपरेशन करताना संबंधित वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने स्वत:ला काल्पनिक धनकुबेर असल्याचे सांगून काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना आर्थिक मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्या प्रतिनिधीशी भेट घेण्यासाठी नईम अत्यंत गुप्तपणे दिल्लीत आला होता. या भेटीदरम्यान नईमने या प्रतिनिधीसमोर अनेक धक्कादायक खुलासे केले.

नईम म्हणतो…
मागील सहा वर्षांपासून काश्मीरमध्ये भारताविरुद्ध मोठे आंदोलन उभे करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न सुरु आहेत. काश्मीरमध्ये हिंसाचार घडवून आणण्यासाठी किती पैसा पुरवण्यात आला या प्रश्‍नावर नईमने सांगितले की, पाकिस्तानकडून कोट्यवधी रुपये मिळाले आहेत, पण आम्हाला आणखी पैसे पाहिजेत. याशिवाय इस्लामाबादमधून कशा पद्धतीने भारत सरकारच्या काळा पैसा बाळगणार्‍याच्या विरोधातील प्रयत्नांना विरोध करतेय याचा खुलासा नईमने या स्टिंग ऑपरेशनमध्ये केला. काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्याने ऑन रेकॉर्ड अशा पद्धतीने खुलासा केला आहे.

माहोल बदलला
या स्टिंग ऑपरेशननंतर काश्मीरमधील राजकारण कमालीचे तापले आहे. यासंदर्भात पीडीपी सरकारमधील मंत्री हसीब दराबू यांनी सांगितले की, शाळांना आगी लावण्यासाठी कसा पैसा वापरण्यात आला, हे या खुलाशावरून स्पष्ट होते. मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी हे स्टिंग ऑपरेशन पाहिले आहे. राज्यातील फुटीरवादी नेत्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.