संत तुकाराम साखर कारखाना; उसतोड कामगार कारखान्यावर दाखल
राज्यातील दुष्काळामुळे कामगारांनी घेतला कारखान्याचा आश्रय
शिरगाव : दारूंब्रे, कासारसाई येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उसतोड कामगार या कारखान्यावर मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. त्यामुळे सायंकाळी कारखान्याचा परिसर उसतोड कामगारानी जणू फुलून गेला आहे, असे चित्र या सध्या कारखाना परिसरात पाहायला मिळत आहे. कारखान्याचा मोळी टाकण्याचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वीच झाला असल्याने आता उसतोड करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून उसतोड कामगार कारखाना परिसरात डेरेदाखल होत आहेत. मराठवाड्यासह बर्याच जिल्ह्यात दुष्काळ असल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणावर उसतोड कामगार येत आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळ जाणवू लागल्याने हे कामगार राज्यातील कारखान्यांच्या आश्रयाला आले आहेत.
हे देखील वाचा
यावर्षी दिवाळीपुर्वीच आले
दरवर्षी हे कामगार दिवाळी आपल्या घरी साजरी करून कारखान्यावर येत असतात, परंतु यावर्षी गावा-गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. तसेच कारखानेही लवकर सुरु झाल्याने या कामगारांना आपली दिवाळी कारखान्यावर साजरी करावी लागणार आहे. उसतोड कामगारांमध्ये बहुतांश कामगार हे बीड, उस्मानाबाद, लातूर, धुळे, जळगाव, चाळीसगाव, जालना, औरंगाबाद, नांदेड आदी मराठवाडा व खानदेश भागातील आहेत. यावर्षी पावसाने या दडी मारल्याने आहेत ती पिके काढून घेऊन उर्वरित पिक कोणाकडे तरी वाटणीवर सांभाळण्यास देवून हे कामगार उस तोडणीच्या कामावर दाखल होत आहेत. मागील वर्षी जास्त पाऊस पडला नाही आणि यावर्षी तर चक्क दुष्काळच आहे. त्यामुळे सलग दोन वर्ष नापिकीने होरपळलेल्या या कामगारांना अधिकाधिक उसतोडणी करून जास्तीत जास्त पैसा मिळवून आपली बिघडलेली परिस्थिती पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत, हे निश्चित.
उसतोड कामगारांची लबगब
सध्या कारखाना परिसरात उसतोड कामगार बैलगाडी, टायर गाडी, ट्रक, ट्रॅक्टर आदींद्वारे दाखल झाले आहेत. या सर्व उसतोड कामगारांमुळे कारखान्याचा परिसर गजबजला आहे. सर्व कामगारांनी राहण्यासाठी झोपड्या उभा करण्याच्या कामाला वेग दिला आहे. तर काही कामगार आल्या-आल्या पहिले आपली झोपडी उभा करत आहेत. नंतरच बाकीचे काम करण्यास प्राधन्य देत आहेत. कारण गेल्या चार दिवसांपूर्वीच या भागात मोठा पाऊस पडून गेला आहे. त्यामुळे आपला लहानसा संसार पावसात भिजू नये, यासाठी पहिला आशियाना करण्यासाठी या उसतोड कामगारांची लगबग सुरु झाली आहे.