एरंडोल। कासोदा रस्त्यावरील अमळनेर नाक्यापासून पालिकेच्या सार्वजनिक उद्यानापर्यंत असलेल्या सुमारे पाउण किलो मिटर अंतर असलेल्या रस्त्यावर अठ्ठेचाळीस खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांसह सर्व सामान्य नागरिक देखील त्रस्त झाले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्याचे अस्तित्वच संपुष्टात आले असून लोकप्रतिनिधीसह संबधित अधिकार्यांनी रस्त्याच्या समस्येकडे लक्ष न दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एरंडोल-कासोदा रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अमळनेर नाका ते पालिकेच्या सार्वजनिक उद्यानापर्यंत सुमारे पाउन किलोमीटर अंतरात तब्बल अठ्ठेचाळीस मोठे खड्डे पडले आहेत. यामध्ये सहा खड्ड्यांचा आकार पंधरा ते विस फुट झाला आहे. तर इतर खड्डे तीन ते चार फुट लांब आणि अर्धा ते एक फुट खोल आहेत. तसेच या रस्त्यावर घरगुती पाण्यासाठी घेतलेल्या नळाच्या एकोणावीस ठिकाणी चार्या खोदण्यात आल्या आहेत. या रस्त्यावरून चाळीसगाव, औरंगाबाद यासह परराज्यात जाणारे व येणारे शेकडो वाहनांची दररोज ये जा सुरु असते.
खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनांचे नुकसान
या रस्त्यावरील सुमारे पाउण किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सुमारे दहा ते पंधरा मिनिटे लागत असल्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत. शिवाय खड्ड्यांमुळे वाहनांचे देखील नुकसान होत असल्यामुळे वाहन मालकांना देखील आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सदरचा रस्ता जिल्हा परिषदेचा आहे का सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. याबाबत दोन्हीही विभागांकडून माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे सदरचा रस्ता बेवारस आहे का? असा प्रश्न वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे अनेक वाहन चालक या रस्त्या ऐवजी राष्ट्रीय महामार्गावरून दत्त मंदिरमार्गे सुमारे तीन किलोमीटर लांबून जात असुन इंधनाच्या खर्चाचा भार सहन करीत आहेत. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वार वाहन घसरून पडले असून किरकोळ स्वरूपाचे जखमी झाले आहेत.
साईटपट्ट्या झाल्या 2 फुट खोल
रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्यामुळे रस्त्यापासून सुमारे दीड ते दोन फुट खोल गेल्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरीकांमध्ये व्यक्त केली जात आहे. या रस्त्याच्या लगत वैतागवाडी नावाची गरीब लोकांची वस्ती असून अत्यंत भययुक्त वातावरणात तेथिल रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत. या रस्त्यावरुनच अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिकार्याचे ये जा असताना देखील रस्त्याची समस्या सुटू शकलेली नाही. या बाबत वरिष्ठ अधिकार्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी त्वरित दाखल घेवून रस्त्याची समस्या सोडवावी अशी मागणी वाहन चालक तसेच परिसरातील रहिवाशांनी केली आहे.