मुंबई : पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना हाकला ही बाळासाहेबांचीच भूमिका होती असं सांगत भगवी वस्त्र घातल्याने कोणी हिंदुत्व स्वीकारले असे होत नसल्याचा दावा शिवसेनेने केला होता. यावर मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले की, ज्यांचं सरकार अजित पवार चालवतात त्यांनी आम्हाला शिकवू नये, मुख्यमंत्र्यांकडे जेवढी गर्दी होत नाही तेवढी अजितदादांकडे असते. थोड्या दिवसाने अजित पवार शिवसेना चालवतील असा टोला लगावला आहे.
तसेच शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे पाहून शिवसेनेला मतदान करत नव्हते तर बाळासाहेबांना मानणारे, त्यांच्या हिंदुत्वाकडे पाहून शिवसेनेला मतदान करत होते. मात्र उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे अनेक शिवसैनिक नाराज आहेत. शाखाप्रमुख ते सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे दुखावला गेला आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम राज ठाकरे करत असतील तर हे शिवसैनिक काही दिवसांत मनसेत मोठ्या प्रमाणात प्रवेश करतील हे आगामी काळात दिसेल असा इशारा दिला आहे.
दरम्यान, पाकिस्तानी, बांग्लादेशी हे मुद्दे आत्ताच का आठवले? गेली १४ वर्ष मनसे कुठे होती? मनसेची भूमिका सतत बदलणारी आहे. त्याचसोबत काही दिवसांपूर्वी शहा-मोदी यांना राजकीय पटलावरुन बाजूला फेका असं टोकाचा विरोध केला आता सौम्य झाले आहेत हे लोकांना दिसतं. हिंदुत्वाचा मुद्दा मनसेने कधी आणला नव्हता, भगवी वस्त्र घातल्याने कोणी हिंदुत्व स्वीकारलं असं होत नाही. लोकांनी भाषणात टाळ्या वाजवल्या, मनोरंजन केलं अशी खोचक टीका शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी राज ठाकरेंवर केली होती.