दिल्ली: काही देश चीनकडून आर्थिक मदत घेत आहेत पण फुकटात काहीच मिळत नसते हे या देशांच्या लवकरच लक्षात येईल असे भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटले आहे. रविवारी पुण्यात औंध येथे सैन्याच्या एका समारोपाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले. भारताचा जवळच मित्र असलेला नेपाळ सध्या चीनच्या निकट जात आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना रावत म्हणाले कि, ज्या देशाला आपली आर्थिक प्रगती करायची आहे, त्यांना इतर देशांबरोबर द्विपक्षीय आणि सहकार्याचे संबंध ठेवावेच लागतील.
सध्या चीनकडे भरपूर पैसा आहे. जे देश त्यांच्याकडून आर्थिक मदत घेत आहेत त्यांना लवकरच लक्षात येईल कि, फुकटात काहीच मिळत नसते. सर्व संबंध तात्पुरते आहेत. जागतिक स्तरावर सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलल्यानंतर या संबंधांमध्ये बदल होणारच असे रावत म्हणाले. दोन देशांचे संबंध कसे बदलतात त्याचे अमेरिका-पाकिस्तान उत्तम उदाहरण आहे.