किनगावच्या तरुणाची फसवणूक : वधूसह दोघांविरोधात गुन्हा

यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथील एका 29 वर्षीय तरूणास सव्वा लाखात लग्नाकरीता मुलगी देण्यात आली तसेच लग्न आळंदी येथे लावुन सात दिवसाच्या संसारानंतर वधू मुलीला आईकडे नेत आहे, असे सांगत नंतर परत आणलेच नाही. दरम्यान ठरलेल्या रक्कमे पैकी रोख रक्कमेसह 99 हजारात फसवणूक केल्याने वधूसह तिच्या मानलेल्या भावाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

आईला भेटण्यास गेली मात्र परत आलीच नाही नववधू
धनंज हिरालाल सोनार (किनगाव बुद्रुक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अंजाळे येथील जीवन सुरेश पंजे यांच्या ओळखीचे यशवंत उर्फ दादु विजय पाटील (सांगवी खुर्द) यांची मानलेली बहिण सरीता प्रकाश कोळी (अंजाळे) हिच्या सोबत विवाह निश्चित झाला होता. या करीता सव्वा लाख रूपये द्यावे लागतील व लग्नाचा खर्च मुलास करावा लागेल, असे यशवंत उर्फ दादू याने सांगितले होते. सुरूवातीला 10 हजार रुपये देण्यात आले व नंतर किनगाव येथे नवरी मुलीचा बस्ता फाडण्यात आला व परत यशवंत उर्फ दादु विजय पाटील यास 25 हजार रुपये देण्यात आले व 14 डिसेंबर 2021 रोजी देहू आळंदी, पुणे येथील अलंकापुरी मंगल कार्यालय, पुणे येथे लग्न झाले. लग्नानंतर लागलीच पुन्हा 50 हजार रुपये देण्यात आले व लग्नाच्या सात दिवसा नंतर यशवंत उर्फ दादु विजय पाटील हा फिर्यादीच्या घरी आला होता व वधू मुलगी सरीता प्रकाश कोळी हिला तिच्या आईला भेटण्यासाठी घेवुन जातो, असे सांगून घेवुन गेला. तेव्हापासून तो परतच आला नाही.

यावल पोलिसात दाखल झाला गुन्हा
वारंवार फोन करून, निरोप देवून शोध घेवूनही वधू व तिचा मानलेला भाऊ मिळून न आल्याने दोघांनी फसवणूक केल्याचे निर्दशनास आले व तेव्हा शुक्रवारी दोघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार करीत आहे.

99 हजारांची फसवणूक
लग्न ठरतांना प्रथम व्यवहार निश्चित करतांना 10 हजार, चार हजार 250 रुपयांच्या साड्या, लग्नाचा बस्ता झाला तेव्हा पुन्हा 25 हजार रोख, लग्न झाले सत्यनारायण झाले तेव्हा पुन्हा 50 हजार, सात हजार 620 रुपयांचे मंगळसुत्र, पोत व चांदीवे जोडवे साकळ्या, एक हजार 300 रुपयांचे चांदीचे वाडे, आईस भेटायला जातांना एक हजार रूपये रोख असे एकूण रोख रक्कमेसह 99 हजार 170 रुपयात फसवणूक करण्यात आली.