एकात्मतेचे प्रतीक दर्गा ; नवसाला पावण्याची श्रद्धा असल्याने अनेकांनी केले नवस पूर्ण
यावल – राष्ट्रीय एकात्मितेचे प्रतीक असलेल्या तालुक्यातील किनगाव येथील हजरत मलंगशाह बाबा यांचा ऊर्स शरीफ मंगळवारी मोठ्या उत्साहत साजरा झाला. सकाळपासून गावातील चुंचाळे रस्त्यावरील दर्ग्यावर नवस फेडण्याकरीता हिंदू-मुस्लिम बांधवांची गर्दी उसळली. रात्री सुन्नी जामा मस्जिद चौकात कव्वालीचा मुकाबला पाहण्यासाठीही गर्दी झाली होती. किनगाव येथे पंचक्रोशीतील हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रद्धेचे प्रतीक असलेल्या हजरत मलंगशाह बाबा यांचा ऊर्स शरीफनिमित मंगळवारी सकाळपासून सवाद्य मिरवणूकद्वारा बाल-गोपाळांना सजवून नवस फेडण्यासाठी दर्ग्याहवर आणण्यात आले. या ठिकाणी पेढा, जिलेबी, साखरसह आदी मानलेल्या नवसानुसार बालकांची तुला करण्यात आली. विशेष म्हणजे नवस फेडण्यास आलेल्या सर्वधर्मीय बांधवांच्या उपस्थितीने राष्ट्रीय एकात्मतेचे चित्र निर्माण झाले होते.