यावल : तालुक्यातील किनगाव येथील एका महिलेला व्हॉट्सअॅपवर मेसेज टाकून तुमची 25 लाखांची लॉटरी लागली असल्याचे सांगत एका भामट्याने महिलेकडून 29 जून ते 02 जुलै दरम्यान तब्बल तीन लाख 80 हजार रुपये उकळले. मुलीच्या विवाहासाठी सुरक्षीत ठेवसह नातेवाईकांकडून पैसे घेवुन भामट्यांना देण्यात आले मात्र लॉटरीचे पैसे न मिळाल्याने व फसगत झाल्याने विवाहितेने हा प्रकार आपल्या पतीस सांगितला व या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा यावल पोलिसात अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीसह सायबरच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा
किनगाव, ता.यावल येथील मंगला महेंद्र बोरसे या विवाहितेला 29 जून रोजी सकाळी व्हॉट्सअपवर कॉल आला व समोरील व्यक्तीने तुमची 25 लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचे सांगून महिलेकडून बँक खात्याची माहिती मागितली. महिलेने त्यांच्या पतीच्या जिल्हा मध्यवर्ती बँक किनगाव शाखेतील पासबुकचा फोटो काढून व्हॉट्सअॅपवर पाठवला. या खात्यावर 25 लाख टाकण्यासाठी पंचवीस हजार रुपयांचा खर्च लागेल म्हणून तुम्ही आधी मला 25 हजार रुपये फोन पे ला पाठवा, अशी भामट्याने मागणी केली. 29 जुन ते 02 जुलै अशा चार दिवसात महिलेने अज्ञात भामटा सांगत असल्यानुसार त्याला वेळोवेळी फोन पे तसेच त्याने दिलेल्या एका बँक खात्यावर असे एकूण तीन लाख 80 हजार रुपये पाठवले.
नातेवाईकांकडूनही घेतले पैसे
शुक्रवारी महिलेकडे पुन्हा त्यांनी पैशाची मागणी केली असता महिलेकडील बँक खात्यातील सर्व रक्कत संपली होती व तिने नातेवाईकांकडून उधार पैसे घेतले तेदेखील संपले. या प्रकाराची माहिती महिलेने पती महेंद्र रमेश बोरसे यांना सांगितले व शुक्रवारी रात्रीच त्यांनी यावल पोलिस स्टेशन गाठत अज्ञात भामट्यांविरुद्ध तक्रार नोंदवली. तपासस यावल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, सहाय्यक फौजदार अजीत शेख, हवालदार संदीप सूर्यवंशी, नरेंद्र बागुले आदी करीत आहेत.