यावल : तालुक्यातील किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातील ग्रामदैवत आई भवानी मातेच्या मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर भाविकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाढत्या चोर्यांमुळे घबराट
किनगाव गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात ग्रामदैवत आई भवानी मातेचे मंदिर आहे. या मंदिराच्या बाहेर होम बांधण्यात आला असून तेथे त्रिशुल गाडले आहे. अज्ञात चोरट्याने मध्यरात्री नंतर हे गाडलेले त्रिशूल काढून त्याव्दारे मंदिराची जाळी तोडुन मंदिरात चोरीचा प्रयत्न केला मात्र त्यात त्याला यश आले नाही. शुक्रवारी सकाळी मंदिरात पुजे करीता पूजारी प्रदीप जोशी हे पोहोचल्यानंतर हा प्रकार निर्दशनास आला. घटनास्थळी पोलिसांनी भेट देवून पाहणी केली. पूजारी प्रदीप जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.