यावल – दुचाकीस्वारास कट मारल्यानंतर संतप्त जमावाने ट्रक चालकावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकानेच जमावावर तलवार काढल्याने किनगावात घबराट पसरली तर पोलिसांनी वेळीच धाव घेत ट्रक चालकासह क्लिनरला ताब्यात घेतले. झाले असे की, दुचाकीस्वार अधिकार दगडू पाटील हे दुचाकी (एम.एच.19 ए.ए.9303) ने किनगाव-यावल रस्त्यावरून यावलकडे येत असताना ट्रक चालक हॅप्पी उर्फ बिरबल खान रमजान खान हा ट्रक (पी.बी.10 सी.जे.6532) ने यावलकडून चोपड्याकडे जात असताना हॅप्पीने ट्रकचा पाटील यांना साकळी गावाजवळ कट मारला. याबाबत त्यांनी किनगावपर्यंत पाठलाग केल्यानंतर ट्रक चालकास अडवत जाब विचारला. प्रसंगी जमावही एकत्र जमला व ट्रक चालक हॅप्पीसह क्लीनर गगनदीपसिंग बलविंदरसिंग (25, दोन्ही रा.कूप खुर्द, ता.मरीयाल, पंजाब) यांच्यावर चाल करू लागताच आरोपीने तलवार काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी ट्रक चालकांजवळील दोन मोबाईलसह साडेचार हजारांची रोकड लंपास झाली. ट्रक चालकाविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.