यावल : तालुक्यातील किनगाव येथे अंगणवाडीत जाणार्या लहान बालिकांचे भांडण झाल्यानंतर त्यावरून विचारणा झाल्याने शाब्दीक वाद मारहाणीवर पोहोचला. या वादात संतप्त बालिकेच्या आईने चुलत दिर, पतीसह इतरांना माहेरील लोकांसह तृतीयपंथीना सोबत घेत जबर मारहाण केली. या प्रकरणी यावल पोलिसात दंगलसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
अशी घडली घटना
किनगाव, ता.यावल येथील भूषण शिवाजी साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या चुलत भावाच्या मुलीने अंगणवाडीमध्ये त्यांच्या मुलीला मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी त्याची आई बालिकेच्या आईकडे गेली तेव्हा बालिकेची आई मोना संदीप साळुंके हिने साळुंके यांच्या आईला शिविगाळ केली व वाद वाढला. या वादात मोनाचे पती संदीप साळुंके यांनीदेखील पत्नी मोना हिला कानशिलात मारली. याचा राग आल्याने मोना संदीप साळुंखे ही जळगावी माहेरी गेली व जळगाव येथील अयोध्या नगरातील तिचे वडील बाबुराव मेढे, भाऊ संजय बाबुराव मेढे, सुनीता बाबुराव मेढे, गणेश बापूराव मेढे व जळगावातील चार तृतीयपंथी असेही किनगाव येथे आले व त्यांनी फिर्यादी भूषण साळुंके, मोना हिचे पती संदीप साळुंखे, अर्चना साळुंके यांना मारहाण केली. यामध्ये अर्चना साळुंके तिला उजव्या डोळ्याच्या वर भुवईवर दुखापत झाली.
घराची केली नासधूस
मारहाण करण्यासाठी आलेल्या सर्वांनी भुषण साळुंके यांच्या घराची नासधुस केली तर भांडण वाढत असल्याचे पाहुन त्याच भागातील अक्षय बापू साळुंखे, अभिजीत किरण साळुंके, योगेश साळवे, विशाल शिवाजी साळुंके यांनी यांनी तेथे येऊन भांडण थांबवले व जखमींना यावल ग्रामीणमध्ये आणून त्यांच्यावर वैद्यकिय उपचार केले. मोना साळुंके, तिचे वडील बाबुराव मेढे, भाऊ संजय बाबुराव मेढे, सुनीता बाबुराव मेढे, गणेश बापूराव मेढे व जळगावातील चार तृतीयपंथी अशांनी लाठ्या-काठ्या घेऊन फिर्यादी व त्यांची पत्नी यांना मारहाण करून गंभीर जखमी केले व घरातील तोडफोड केली म्हणून त्यांच्या विविध दंगली सह कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार अजीज शेख, हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.