यावल : तालुक्यातील किनगाव खुर्द येथे दोन गटात किरकोळ कारणावरून शाब्दीक वाद उफाळल्याने तुफान हाणामारी होवून धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला. या घटनेत एका गटाचे तीन तर दुसर्या एकाचा एक जण जखमी झाले असून या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीनंतर आठ संशयीतांविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने किनगाव खुर्द गावात मोठी खळबळ उडाली आहे.
चाकूहल्ल्यात पहिल्या गटाचे तिघे जखमी
पहिल्या गटातर्फे दगडू नवाज तडवी (26, किनगाव खुर्द) यांनी फिर्याद दिली असून संशयीत आरोपी रहिम शहा, शफीक रहिम शहाख सुलतान रहिम शहा, भुरा रहिम शहा (सर्व रा.किनगाव खुर्द) या पिता-पूत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवार, 15 रोजी रात्री 9.10 वाजेच्या सुमारास दगडू तडवी यांनी संशयीत रहिम शहा यांना तुमची मुले माझ्या घराजवळील जुन्या फॉरेस्टजवळ विनाकारण गर्दी जमा करतात, गोंधळ घालतात, या ठिकाणी महिला असल्याने त्यांना समज द्यावी, असे सांगितले व त्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी जातीवाचक शिविगाळ केली तसेच संशयीत शफीक, सुलतान, भुरा शहा यांनी येवून फिर्यादीस मारहाण केली तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तौसीफ नजीर तडवी याच्या कमरेवर तर शरीफ लुकमान तडवी याच्या पोटावर धारदार शस्त्र मारून जखमी केले.
दुसर्या गटाची तक्रार : चौघांविरोधात गुन्हा
दुसर्या गटातर्फे सुलतान शहा रहिम शहा (17, किनगाव) यांनी फिर्याद दिल्याने संशयीत दगडू नवाज तडवी, तौसीफ नजीर तडवी, शरीफ लुकमान तडवी, शाहरूख तडवी (सर्व रा.किनगाव खुर्द, ता.यावल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सुलतान शहा यांच्या तक्रारीनुसार, आरोनी दगडू तडवी याने फिर्यादीस जवळ बोलावून तुम्ही येथे गर्दी करून गोंधळ घालतात, तुझा भाऊ मुलींचे नंबर मागतो, असे सांगितले व त्यास तक्रारदार समजावण्यास गेला असता आरोपींनी मारहाण केली तसेच साक्षीदार रहिम शहा, तोहिद शहा, शाहुद उर्फ भुरा यांना मारहाण करण्यात आली तसेच आरोपी दगडू तडवीने त्याच्या हातातील चाकूने सुलतान शहा यांच्या डाव्या मांडीवर मारून गंभीर दुखापत केली.