किन्हवलीत डेंग्यूचे रुग्ण

0

किन्हवली । किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत डेंग्यूचे रूग्ण आढळले असून ते सर्व कल्याण किंवा अन्य शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेतील व बाहेरील गावातील तापाच्या आजाराने फणफणलेल्या रुग्णांनी किन्हवली येथील आशा पॅथॉलॉजी लॅब या खासगी रक्त तपासणी केंद्रात रक्त तपासल्यानंतर भारती कुडव(मुसई), दामोदर मलीक(मुरबाड), प्रकाश दिनकर(बाभळे), अभय बांगर (शीळ), तानाजी कुडव(मानिवली), योगेश हरड (खरीवली), अभय पतंगराव(किन्हवली) व विष्णू निपुर्ते(अस्नोली) अशा आठ जणांना डेंग्यू झाल्याचे दिसून आले.

आरोग्य केंद्राचे दुर्लक्ष
डेंग्यूबाबत रक्त तपासणी केंद्रात जाऊन माहिती गोळा करणारे किन्हवली आरोग्य केंद्रातील कर्मचारी लहू शेलवले याची पत्नी आजारी असल्याने ते सुट्टीवर आहेत. परंतु त्यांच्या गैरहजेरीत आशा पॅथॉलॉजी लॅबने डेंग्यू रुग्णाबाबत वारंवार कळवूनही किन्हवली आरोग्य केंद्राने दुर्लक्ष केले. डेंग्यू झालेले सर्व रुग्ण कल्याणसारख्या ठिकाणी खासगी इस्पितळात महागडे उपचार घेत असून काही रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

आमच्या लॅबमध्ये डेंग्यू अथवा अन्य साथीच्या आजाराचे पॉजिटीव्ह रिपोर्ट आला की तातडीने आरोग्य केंद्रास कळवतो
-अजित आचार्य,
लॅब टेक्निशियन,
आशा पॅथॉलॉजी लॅब, किन्हवली

डेंग्यू संशयास्पद रुग्ण, त्यांचे नातेवाईक, शेजारी यांचे रक्त नमुने घेऊन ते ठाणे सिव्हिल रुग्णालयात पाठविण्याचे आदेश आमच्या कर्मचार्‍यांना दिले आहेत.
-विनय देवळोलकर,
प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी, पं.स.शहापूर