किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी

0

चाकण : शेतातून नेण्यात आलेल्या पाईपलाईनच्या वादातून दोन गटांमध्ये कोयते, लाकडी दांडकी, खोर्‍याने हाणामारी करण्यात आल्याची घटना निघोजे (ता.खेड) येथे शनिवारी सायंकाळी घडली आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून एकूण सात जणांवर गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास महादू येळवंडे (वय 50) व बायडाबाई कैलास येळवंडे (वय 45), किरण पिराजी पानसरे (वय 48) व कैलास पिराजी पानसरे अशी मारहाणीत जखमी झालेल्यांची नावे आहेत.

कैलास येळवंडे यांनी या बाबत फिर्याद दिली. त्यानुसार किरण पानसरे, दर्शन पानसरे, अमित पानसरे व कैलास पानसरे यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण पिराजी पानसरे (वय 48) यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार पाईप लाईन शेतातून घेतल्याच्या कारणावरून कैलास महादू येळवंडे (वय 50), बायडाबाई कैलास येळवंडे (वय 45) व त्यांचा मुलगा समीर कैलास येळवंडे यांनी संगनमताने लोखंडी कोयत्याने मारहाण केली. फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ कैलास पानसरे यांस गंभीर जखमी केले. त्यानुसार कैलास येळवंडे त्यांची पत्नी व मुलावर गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार करीत आहेत. मारहाणीतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.