Murder of laborer at Ozarkheda dam : Accused sentenced to life imprisonment by Bhusawal court भुसावळ : तालुक्यातील ओझरखेडा धरणावर किरकोळ वादातून 30 वर्षीय तरुण मजुराचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचे कामकाज भुसावळ न्यायालयात चालल्यानंतर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा न्या.व्ही.सी.बर्डे यांनी नुकतीच सुनावली.
भुसावळ न्यायालयात खटल्याचे कामकाज
खटल्याबाबत माहिती अशी की, 9 ऑगस्ट 2013 रोजी ओझरखेडा धरणावर सिद्धार्थ उर्फ बाळू रानबा खिल्लारे (30) यांचा संशयीत आरोपी शेख अल्ताफ शेख पप्पू व शेख कदीर शेख बशीर यांच्याशी किरकोळ वाद झाल्यानंतर आरोपींनी लोखंडी सळई व पाईपाने मारहाण केल्याने खिल्लारे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वरणगाव पोलिसात आरोपींविरोधात वसंत सोपान काकडे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2013 मध्ये संशयीत शेख अल्ताफ शेख पप्पू याची भुसावळ सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यानंतर सरकारी वकील अॅड.विजय खडसे यांनी औरंगाबाद खंडपीठात या संदर्भात अपिल दाखल केले असून त्याबाबत सुनावणी सुरू आहे तर दुसरा आरोपी शेख कदीर शेख बशीर यास अटक केल्यानंतर त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
जन्मठेपेसह पाच हजार रुपये दंड
भुसावळ सत्र न्यायालयाचे न्या.व्ही.सी.बर्डे यांच्या न्यायासनापुढे खटल्याचे कामकाज चालल्यानंतर न्यायालयाने आरोप शेख कदीर यास जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड सुनावण्यात आला. खटल्यात नऊ साक्षीदार तपासण्यात आले तर प्रत्यक्षदर्शी व फिर्यादी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारतर्फे अॅड.विजय डी.खडसे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार धनसिंग मदन राठोड यांनी सहकार्य केले.