शिरपूर: धुळे तालुक्यातील फागणे येथे संकेश्वर किराणा दुकान फोडून त्यातील किराणा सामानाची चोरी केल्याची घटना 4 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी धुळे एलसीबीने अवघ्या चार तासात गुन्हा उघडकीस आणून मुद्देमालासह चोरट्यांना जेरबंद केले. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.
घरात 25 हजाराचा किराणा माल आढळला
गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, धुळेकडे सुरु असताना पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गोपनिय बातमीदारामार्फत याबाबत माहिती मिळाली होती. हा गुन्हा आबा राजू पवार याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केला आहे. त्यातील चोरलेला मुद्देमाल हा त्यांनी फागणे गावातील एका घरात लपवून ठेवलेला आहे. त्यावरून त्यांनी पथकास आदेश देऊन त्यांचा शोध घेऊन तपास करण्याचे आदेश दिले. त्यावरून पथकाने फागणे गावात जाऊन नमूद घरावर छापा घालून घराची झडती घेतली. झडतीत त्या घरात सुमारे 25 हजार 292 रूपये किंमतीचा किराणा माल आढळून आल्याने तो जप्त केला आहे. तसेच चोरी करणारे आबा राजू पवार (भील, वय 32) आणि सुनील लक्ष्मण पाटील (वय 25, दोघे रा.फागणे, ता.जि.धुळे) यांना फागणे गावात शिताफीने पकडण्यात आले आहे. त्यांना पुढील कारवाईसाठी धुळे तालुका पोलीस स्टेशनला हजर केले आहे.
उर्वरित आरोपींचा शोध सुुरु
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.ग.शा.धुळेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पो.हे.काँ.रफीक पठाण, पो.ना.प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, राहुल सानप, चा.पो.ना. विलास पाटील यांच्या पथकाने केली. उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे.