किरीट सोमय्यांना सेनेवरची टीका भोवली ; भाजपकडून मनोज कोटक यांना उमेदवारी

0

मुंबई-भाजपचे दिग्गज नेते ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा अखेर लोकसभा निवडणुकीतून पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला प्रामुख्याने शिवसेनेतून विरोध होत होता. त्यामुळे भाजपला उमेदवार बदलावा लागल्याचे बोलले जात आहे.

सेनेवरची टीका भोवली
भाजप-शिवसेना यांच्यातील दुरावा संपुष्टात आला असला तरी किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेला थेट हल्ला शिवसैनिक विसरले नाहीत. मुंबई महापालिका निवडणुकीवेळी किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. उद्धव ठाकरेंना लक्ष्य करताना सोमय्या यांनी वांद्र्याचा बॉस, मुंबईचे माफिया असे शब्द वापरले होते. ही टीकाच सोमय्या यांना भोवली व त्यांचा पत्ता कापण्यात आला, असे सांगण्यात येत आहे. शिवसेनेचे विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांनी तर सोमय्या यांच्या उमेदवारीला थेट आव्हान दिले होते. सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार, असा इशारा राऊत यांनी दिला होता. त्यातच भाजपमधील एक गट सोमय्या यांच्यावर नाराज होता. त्यामुळेच केंद्रीय निवडणूक समितीकडे सोमय्या यांचे नाव पाठवलेले असतानाही ऐनवेळी हे नाव मागे घ्यावे लागले आहे.

सोमय्या यांच्याऐवजी या मतदारसंघातून मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोटक यांनी मुंबई महापालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहे. त्यांचा शिवसेनेसोबतही त्यांचा चांगला समन्वय आहे. कोटक यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील भाजप-शिवसेनेतील कलह आता शांत होईल, अशी चिन्हे आहेत.