किरीट सोमय्या यांनी पिंपरी-चिंचवड मनपातील भ्रष्टाचार उघड करावा: संजय वाघेरे यांचे आव्हान

0

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार असून तो भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बाहेर काढावा, त्यासाठी आवश्यक पुरावे देऊ असे आव्हान पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांनी किरीट सोमय्या यांना दिले आहे. एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे वाघेरे यांनी किरीट सोमय्या यांना आव्हान दिले आहे. महाविकास आघाडी आणि मुंबई महापालिकेवर सातत्याने किरीट सोमय्या बिनबुडाचे आरोप करतात, त्यापेक्षा त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढावा असे आव्हान दिले आहे.
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ प्रकाशित करत मुंबई महापालिकेच्या वतीने उभारलेल्या निवारा केंद्रातील जेवणावरून टीका केली होती. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला होता.
किरीट सोमय्या यांनी भाजपच्या ताब्यात असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेल्या निवारा केंद्रातील परिस्थिती पहावी. या ठिकाणी असलेल्या नागरिकांना साधा चहा, नाष्टादेखील मिळत नसून अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. यासाठी महापालिका प्रतिदिन प्रतिव्यक्ती 170 रुपयांपासून 480 रुपये ठेकेदारांना देत आहे. जेवण पुरविणारे सर्व ठेकेदार हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत असे आरोप केले आहे.
भाजपाच्या पदाधिकार्‍यांची पाच वर्षांपूर्वीची संपत्ती आणि आताची संपत्ती जाहीर करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.