किल्ले तिकोणावर प्रथमच साजरा होतोय गणेशोत्सव

0
गड कोटांबद्दल जनसामान्यांमध्ये आदर निर्माण करण्यासाठी राबविला उपक्रम
पारंपरिक पद्धतीने गणरायांचे झाले आगमन
लोणावळा : गड-किल्ल्यांवर एक चैतन्याचे वातावरण तयार व्हावे, लोकांमध्ये गडकोटांबद्दल योग्य तो आदर सन्मान निर्माण व्हावा, गड-किल्ल्यांचे संवर्धन व संरक्षण व्हावे याकरिता एक प्रयत्न म्हणून किल्ले तिकोनागडावर यंदापासुन गणेशोत्सवाची सुरवात करण्यात आली आहे. काल गुरुवारी गडावर गणेशाचे पारंपरिक पद्धतीने आगमन झाले. या उत्सवाकरिता कामशेत येथील चंद्रकांत लोळे यांचेकडुन पर्यावरण पूरक शाडुची गणेश मूर्ती घेण्यात आली. त्यानंतर मावळ परिसरातील शिवभक्त गडपायथ्याशी जमा झाले. गणेशाच्या स्वगताकरिता मावळे, अब्दागिरी, भगवा झेंडा तयार होते. टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये भक्तीमय वातावरणात श्री गणेशाचे गडाकडे प्रस्थान झाले.
मांडव, रांगोळीने केले स्वागत
गणपती बाप्पा हे देवडी गुहा, वेताळाचा माळ, चपेटदान मारूतीराय मार्गाने गडमध्यावरील तळजाई माता लेणीजवळ पोहचले. त्यांच्या स्वागताकरिता मांडव घालून रांगोळी रेखाटण्यात आली होती. आकर्षक आरास करून मधुर आवाजात गणेशाची गाणी वाजविण्यात आली होती. त्यानंतर गणेशमूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना गडावर श्री गणेश विराजमान झालेले आश्‍चर्य वाटले. त्यानंतर गड माथ्यावरील वितंडेश्‍वराच्या मंदिरात पूजा करण्यात आली. श्री गणेश मूर्तीजवळ काही मावळे मुक्कामी थांबले बाकी गडउतार झाले. अनेक लोकांना आपल्या गड-कोटांबद्दल माहिती नसते, असे समोर येत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने  गडावर आलेल्या लोकांना इतिहास समजेल. आपल्या किल्ल्यांविषयी माहिती करून घेतली पाहिजे. यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यापैकीच एक गणेशोत्सव आहे, अशी माहिती मनोहर सुतार यांनी दिली.
रविवारी व्याख्यानाचे आयोजन
किल्ले तिकोनागडावर गणेशोत्सवानिमित्त रविवारी (दि.16 रोजी) डॉ.प्रमोद बोर्‍हाडे यांचे ‘किल्ले तिकोनागड समग्र इतिहास’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दुपारी 3 वाजता ह.भ.प.अशोक महाराज आडकर यांचे कीर्तन रूपी सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी मनोहर सुतार, संतोष गोलांडे, गुरूदास मोहळ, माऊली मोहळ, अक्षय औताडे, किरण चिमटे, डॉ. सुधीर ढोरे, सागर वाळुंज, प्रफुल्ल बावीस्कर व शिवभक्त उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन तिकोना पेठ ग्रामस्थ व मावळ परिसरातील शिवभक्तांनी केले.