किल्ले थाळनेर नष्ट होण्याच्या मार्गावर

0

थाळनेर (दिनेश महाले) । शिरपूर तालुक्यातील होळकरशाहीची श्रीमंती असलेल्या थाळनेर किल्ला नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. फारुकी राजवटीपासून होळकरशाहीच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष असणारा हा किल्ला व थाळनेर गाव आज अतिशय दुर्लक्षित आणि उपेक्षित अवस्थेत आहे. जसा काळ लोटला तसा हा किल्ला नष्ट होत गेला त्याला जबाबदार कोण? आज मोठ्या प्रमाणात किल्ला नष्ट झाला आहे मात्र जेवढ्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्याचं वेगळंच वैशिष्ट्य आहे व त्या जपल्या गेल्या पाहिजेत अशी अपेक्षा सर्वसामान्यांमून व्यक्त होत आहे. या किल्ल्याी निर्मिती फारुकी राजवटीमध्ये करण्यात आली. त्या काळात हा किल्ला फारुकी घराण्याची राजधानी होता. त्यानंतर हा किल्ला मुघल राजवटीमध्ये गेला व नंतर हिंदवी स्वराज्यात 1750 ला हा किल्ला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर सरकार यांच्या ताब्यात आला. हा किल्ला पुरातत्व खाते यांच्या ताब्यात आहे.

थळेश्‍वर मंदीरावरुन नामकरण
या टपाल व्यवस्थेच्या मार्गावर प्रमुख पाच ठाणी होती. त्यामधील किल्ले थाळनेर हे एक प्रमुख ठाण होते. किल्ले थाळनेर होळकर रियासतीच्या अंतर्गत येण्या अदोगर त्याचे नाव स्थलकनगर असे होते. मात्र 18 व्या शतकात राणी अहिल्यादेवी होळकर यांनी तापी नदीच्या काठी असलेल्या थळेश्वर महादेव मंदिराचा नव्याने निर्माण केल्यानंतर या मंदिरावरून थाळनेर हे नाव रूढ झाले.

प्रगती नाही
सुभेदार मल्हारराव होळकर व राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यकाळात या किल्ल्याची नव्याने बांधणी करण्यात आली. मात्र थाळनेरचा कारभार खर्‍या अर्थाने भरभराटीला आला तो राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात. थाळनेर आजच्या घडीला एक छोटेसे गाव असले तरी तत्कालीन होळकरशाहीच्या काळात एक श्रीमंत परगणा होता. वास्तविक आज थाळनेर हे तालुक्याचे ठिकाण हवे होते मात्र विकास झालेले नसल्याने हे एक खेडे गावच राहिले.

ऐतिहासिक पुरावा
शिरपूर तालुक्यासहीत खान्देशात राणी अहिल्यादेवी होळकर यांचे आजही खूप मोठ्या प्रमाणात लोककल्याणकारी कार्य पाहायला मिळते. या सर्व कामांचा लेखाजोखा हा किल्ले थाळनेर मध्ये ठेवला जात होता. तसेच किल्ले थाळनेर हा सातपुडा डोंगररांग व महाराष्ट्र पठाराच्या मध्यभागी येत असल्यामुळे तेथे राणी अहिल्यादेवी यांच्या काळामध्ये एक आरक्षित लष्करी फोज तोफांसहीत सज्ज असतं. 18 व्या शतकात राणी अहिल्यादेवी होळकर यांनी महेश्वर ते पुणे अशी टपाल व्यवस्था सुरु केली होती याचे पुरावे मिळतात.

शौर्य जपावे
राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला होळकरशाहीची श्रीमंती असून तुळशीराम मामा व अन्य हुतात्म यांचा हा किल्ला शौर्यचे स्मारक आहे. तो जपला पाहिजे. स्थानिक प्रशासन, स्थानिक जबाबदार व्यक्तीं व राज्य पुरातत्व खात्याने याकडे लवकर लक्ष देऊन या किल्ल्याचा विकास केला पाहिजे नाही तर हा किल्ला होता असाच एक इतिहास होऊन बसेल आणि तेथील पुरातत्व खाते हे नावाप्रमाणे पुरावे लागेल.