लोहगड-विसापुर विकास मंचातर्फे केली मागणी
तळेगाव दाभाडे-किल्ले विसापूरवरील तटबंदी ढासळत असून या तटबंदीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी लोहगड विसापुर विकास मंचातर्फे पुरातत्व विभागाकडे करण्यात आली आहे. विसापुर किल्ला हा अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेला आहे. या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात पडझड ही झाली आहे. लोहगड विसापुर विकास मंचातर्फे याविषयी वेळोवेळी पुरातत्व खात्याला पाठपुरावा करून त्यांना कल्पना दिली आहे. त्याचा परिणाम म्हणून विसापुरवरील शिवमंदिराचा जीर्णोध्दार पुरातत्व विभागाने केला. तसेच गेली अनेक वर्षांपासून गडाची तटबंदी ढासळत आहे. तरी अजुन तटबंदीचे काम चालू केलेले नाही. तरी पुरातत्व विभागाने या विषयी गांभीर्याने दखल घ्यावी. अशी मागणी लोहगड विसापुर विकास मंचातर्फे केली जात आहे.
मावळातील सुंदर किल्ला
इतिहासकालिन असलेला विसापुर हा मावळातील सुंदर किल्ला आहे. गडाचे क्षेत्रफळ मोठे आहे. पाहण्यासारख्या खूप गोष्टी गडावर आहेत. हा अनमोल ठेवा जपुन ठेवता आला पाहिजे. त्यासाठी पुरातत्व विभागाने या ठिकाणी जोमाने काम करावे असे आवाहन मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे व अध्यक्ष संदीप गाडे तसेच विश्वास दौंडकर, सचिन निंबाळकर, सागर कुंभार, संदीप भालेकर, अनिकेत आंबेकर, मुकुंद तिकोने, अजय मयेकर, राहुल वाघमारे, अरुण काकडे, गणेश उंडे, विठ्ठल कऱ्हे, गौरव गरवड आदी करत आहे.