किसानपुत्र आंदोलनाच्या ५ व्या राज्यस्तरीय शिबीराचा शानदार समारोप

0

दुष्काळग्रस्तांना सरकारने तात्काळ आणि थेट मदत करावी – अमर हबीब

अंबाजोगाई : येथील आद्यकवी मुकुंदराज स्वामी समाधी परीसरात दोन दिवस चाललेल्या ५ व्या राज्यस्तरीय शिबीराचा समारोप अत्यंत यशस्वीपणे झाला. या समारोपात “शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहीजेत” हा एकमुखी ठराव सर्वानुमते घेण्यात आला. या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीराच्या अध्यक्षस्थानी अमर हबीब तर प्रमुख पाहुणे म्हणून संदीप कवडे (इंदोर), बरुण मित्रा (नवी दिल्ली), अंकुश काळदाते (अंबाजोगाई) हे उपस्थित होते.

किसानपुत्र आंदोलनाची लढाई ही सर्जकांच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. आणि या लढाईसाठी महाराष्ट्रातील प्रतिभावंत लोकांचा किसानपुत्र आंदोलनात समावेश असल्याचा अभिमान आहे. शेतकरी विरोधातील तीन प्रमुख कायदे समाप्त करणे हाच किसानपुत्र आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे,अशी भुमिका किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांनी मांडली. अमर हबीब यांनी किसानपुत्र आंदोलनाचे हे शिबीर दुष्काळाच्या छायेखाली होत आहे, या परिस्थितीची किसानपुत्रांना जाणीव असल्याचे सांगून 72 सालच्या दुष्काळाशी या दुष्काळाशी तुलना होऊ शकत नाही या वर्षी मोठे स्थलांतर होण्याची शक्यता आहे असे स्पष्ट केले. अशा वेळी किसानपुत्र आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभा रहावे,असे आवाहन केले. शेतकऱ्यांना मदत करतांना ती सरळ आंणि थेट आर्थिक मदत करा. आणि ज्याला खरी गरज आहे त्या गरजवंत शेतकऱ्यांनाच भरघोस मदत करावी. दुष्काळ परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी शासनाने आग्नीशमन गाडी सारखे काम करावे आणि निघून जावे असेही अमर हबीब यांनी सांगितले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याचे’ वचन जे राजकिय पक्ष जाहीरनाम्यात देतील त्यांच्या मागे किसानपुत्र आंदोलन उभे राहील असे सांगितले.

किसानपुत्र आंदोलनाच्या यशस्वितेसाठी न्यायालयीन आघाडी,संसदीय आघाडी, जनआंदोलन आघाडी, प्रचार आघाडी, राष्ट्रीय विस्तार आघाडी या पाच आघाड्यांवर काम करण्यासाठी या समित्यांची निवड करण्यात आली असून या आंदोलनाचे काम देश पातळीवर नेण्यासाठी आपण यापुढे दिल्ली येथूनच काम करु असे अमर हबीब यांनी जाहीर केले. महाराष्ट्र पातळीवरचे काम यापुढे या पाच आघाड्या पाहतील असे त्यांनी सांगितले.

या समारोपीय कार्यक्रमात अंकुश काळदाते यांनी आपल्या मनोगतात या शिबीरासाठी मुकुंदराज स्वामी समाधी परीसराची निवड केली याबद्दल संयोजकांचे आभार मानले. या दोन दिवसीय शिबीरात किसानपुत्र आंदोलनातील महत्वाची भुमिका समजावून घेता आली याचे समाधान व्यक्त केले. डॉ. संदीप कवडे यांनी आपल्या मनोगतात समाजातील सामाजिक आर्थिक परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या घटकांना समजावून घेण्यासाठी केलेला प्रवास सांगून किसानपुत्र आंदोलनाशी आपण कसे जोडलो गेलो ते सांगितले. या दोन दिवसीय शिबीराने आपल्या वैचारिक आणि बौध्दिक क्षमतेत खुप मोठी भर पडल्याचे त्यांनी सांगितले. किसानपुत्र आंदोलनाची व्याप्ती ही केवळ राज्य पातळीपुरतीच न रहाता देशपातळीवर व पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर जावी अशी अपेक्षा संदीप कवडे यांनी व्यक्त केली.

दिल्लीचे बरुण मित्रा यांनी गरीबीचे कारण हे आपल्याकडे पैसा नाही हे नाही तर अर्थव्यवस्था जखडून टाकणारे कायदे आहेत. अर्थव्यवस्था जखडून टाकणारे हे कायदे रद्द करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाने शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची चळवळ अधिक बळकट होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. समारोप कार्यक्रमात दोन दिवसीय शिबीराच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेणाऱ्या वैजनाथ शेंगुळे, अनिरुध्द चौसाळकर, संदीप खरटमोल, सुभाष शिंदे, अमृत महाजन,नारायण पांडे, दत्ता वालेकर व इतर मान्यवरांचा प्रातिनिधिक स्वरुपात अमर हबीब यांनी सत्कार केला. तर या शिबीराच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या व सहभाग घेतलेल्या सर्व मान्यवरांचे आभार अंकुश काळदाते यांनी मानले. दोन दिवस चाललेल्या या शिबिरात पहिल्या दिवशी वैचारिक चर्चा करण्यात आली व दुसरा दिवस आगामी कार्यक्रमाची दिशा ठरविण्यात आली. अमर हबीब, सागर पिलारे, मकरंद डोईजड, नितीन राठोड,राजीव बसरगेकर, टिम, अनंत देशपांडे, मयुर बागुल, गजानन अमदाबादकर, सन्दीप कडवे, बरुण मित्रा आदींनी चर्चेत भाग घेतला.