पुणे : शाकाहारी विद्यार्थ्यालाच सुवर्णपदक, असा फतवा काढल्यानंतर चोहोबाजूंनी टीका सुरू झाल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने एक पाऊल मागे घेत कीर्तनकार शेलारमामा नावाचे सूवर्णपदक तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
आहारातील भेदभाव मानत नाही
शेलारमामा पुरस्कार 2006 पासून दिले जाते. या पुरस्कारासाठी घातलेल्या अटी शेलारमामा यांच्या कुटुंबियांच्या असून विद्यापीठाच्या नाहीत. विद्यापीठ आहारातील भेदभाव मानत नाही. विद्यापीठाकडून शेलारमामा यांच्या कुटुंबीयांशी चर्चा सुरु असून त्यांना शाकाहाराची अट काढण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. तोपर्यंत शेलारमामा पुरस्कार तूर्त स्थगित ठेवण्यात आल्याची माहिती कुलगुरु नितीन करमळकर यांनी दिली आहे.
अन्यथा हा पुरस्कार कायमस्वरुपी रद्द
शेलारमामा यांच्या कुटुंबीयांनी शाकाहाराची अट काढण्यास मान्यता दिल्यास पुरस्कार पुढे सुरु ठेवण्यात येईल. अन्यथा हा पुरस्कार कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही कुलगुरुंनी सांगितले. विद्यापीठाकडून लोकांनी दिलेल्या देणग्यांच्या आधारे अशा प्रकारचे 40 पुरस्कार दिले जातात. या सर्व पुरस्कारांच्या नियम आणि अटींचा नव्याने आढावा घेतला जाईल. विद्यापीठाची भूमिका सुधारणावादी असल्याचे कुलगुरु यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.
फतवा काढणार्यांना पदमुक्त करा
निर्व्यसनी बरोबर. पण शाकाहारी? रेस्टॉरंट काढले की युनिव्हर्सिटी चालवताय? असा सवाल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुणे विद्यापीठ प्रशासनाला केला आहे. कोणी काय खावे हे कोणी का ठरवावे? शाकाहारी आणि सूवर्ण पदक याचा काय संबंध? असले फर्मान काढणारे कोण आहेत, त्यांनाच सूवर्ण पदक देऊन पदमुक्त करा, असा इशारा विद्यार्थी सेनेचे प्रमुख आदित्य यांनी दिला आहे.