धुळे- माजी सरपंचांकडून गावाच्या विकासासाठी दिलेली अनामत परत करण्यासाठी 50 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी अटकेतील वार-कुंडाणे ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक राजाराम बारकु सांगळे (43, रुपाई नगर, साक्री) यास शनिवारी धुळे न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली.
धुळ्यात सापळा रचून केली होती अटक
वार-कुंडाणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असलेले तक्रारदार 2008-2012 या काळात सरपंच असताना त्यांनी गावाच्या विकासासाठी एक लाख 48 हजारांची अनामत रक्कम ग्रामपंचायतीला दिली होती. ही रक्कम परत मिळण्यासाठी तक्रारदारांनी गटविकास अधिकार्यांना लेखी पत्राद्वारे उपोषणाचा इशारा दिल्यानंतर ग्रामसेवक राजाराम सांगळे यांना अनामत परत करण्याचे आदेश करण्यात आले मात्र सांगळे यांनी 7 रोजी रक्कम परत करण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपीने धुळे शहरातील मालेगाव रोडवरील रेल्वे गेटजवळील हॉटेल सुपर सम्राट येथे लाचेची रक्कम देण्यास बोलावल्यानंतर 25 हजारांच्या असली तर 25 हजारांच्या नकली नोटा तयार करून तक्रारदाराकडे देण्यात आल्या. आरोपीने तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीच्या साक्री शहरातील घराची झडती घेण्यात आली मात्र त्यात काहीही आढळले नाही.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर, हवालदार जयंत साळवे, संतोष हिरे, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडिले, शरद काटके, कैलास जोहरे, संदीप सरग, प्रकाश सोनार, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, संदीप कदम, सुधीर मोरे आदींच्या पथकाने केली होती.