कुंडीत कचरा जाळण्यामुळे लाखोंच्या कुंड्या निघाल्या भंगारात

0

कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून जनजागृती करूनही नागरिकांचा मिळेना प्रतिसाद

देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत कचरा कुंडीत टाकलेला कचरा कुडीतच पेटवून देण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. लाखो रुपये खर्चून खरेदी केलेल्या या कुंड्या वारंवार जळाल्यामुळे चार-पाच महिन्यातंच भंगारात निघु लागल्या आहेत. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात सहभागी झाल्यामुळे सन 2015-16 पासून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने शहरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. कचरामुक्त शहराच्या संकल्पनेसाठी कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्यावर भर दिला जात आहे. याचाच भाग म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्डाने शहरात सर्वाधक कचरा गोळा होणार्‍या ठिकाणांचे सर्वेक्षण करून वर्षभरात सुमारे 25 लाखांच्या कचराकुंड्या खरेदी केल्या. यापैकी 22 मे रोजी 10 लाख 71 हजाराच्या 58 कचराकुंड्या, 2 जुन रोजी 7 लाख 76 हजारांच्या 42 आणि 28 जानेवारी 2018 रोजी आठ लाख 72 हजारांच्या 40 अशा सुमारे 140 कचराकुंड्या खरेदी केल्या.

कूंड्या जळून जीर्ण
आधुनिक पध्दतीच्या कॉम्पॅक्टरने उचलण्यासाठी विशिष्ट पध्दतीने या कुंड्या तयार करण्यात आल्या आहेत. गतवर्षी आणि अगदी अलिकडे जानेवारी महिन्यांत सातही वॉर्डात या कुंड्या लावण्यात आल्या. मात्र, अल्पावधीतच या कुंड्यां खराब झाल्या असून भंगारातही खरेदी होणार नाही, अशी या कुंड्यांची अवस्था झाली आहे. कचरा ओसंडून वाहु लागताच या कुंड्यांतच कचरा पेटविला जात असल्याने हि अवस्था झाली आहे. महामार्गालगत मीनाताई ठाकरे उद्यान, स्वामी विवेकानंद चौक आणि सवाना चौक या भागातील सर्रास कुंड्या जळुन जीर्ण झाल्या आहेत.

सुचना देऊनही नागरीकांचे दुर्लक्ष
वारंवार सूचना देऊन जनजागृती करूनही नागरिकांकडून कुंडीत कचरा जाळण्याचे प्रकार घडत असल्याबद्दल प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांनी कुंडीत कचरा जाळू नये, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप यांनी केले आहे. बोर्डाचे कार्यालय अधिक्षक श्रीरंग सावंत यांनीही याबाबत प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.

ठेकेदाराचे कर्मचारीच जाळताहेत कचरा
कचराकुंडीतच कचरा पेटविण्यामागे सामान्य नागरिकांचे केवळ नाव पुढे केले जात असून सफाईचे काम करणार्‍या ठेकेदाराचे कर्मचारीच काम टाळण्यासाठी कुंडीतच कचरा पेटवून देत असल्याची माहिती पुढे आली आहे. पहाटे सफाईसाठी येणार्‍या महिलांकडून जागोजाग कचरा गोळा केला जातो. हा कचरा संकलीत करून ढकलगाडीतून प्रमुख कचराकुंडीपर्यंत न्यावा लागतो. मात्र, मनुष्यबळ कमी करण्यासाठी हा टप्पाच टाळला जातो. गोळा केलेला कचरा जागच्याजागी जाळणयत येतो. कचरा उचलण्याची तसदी टाळण्यासाठि हेच कर्मचारी कुंड्यांमधील कचरा पेटवून देत असल्याचे सांगितले जाते.