कुंभच्या यात्रेला जातांनाही मोदी खोटे बोलत आहे-कॉंग्रेस

0

नवी दिल्ली- राफेल करारात कोणत्याही प्रकारचे अपहार झालेले नाही असे सांगत सुप्रीम कोर्टाने राफेलच्या चौकशीची याचिका फेटाळली. त्यामुळे राफेलवरून भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र कॉंग्रेस आरोपावर ठाम आहे. राफेल करारावरुन मोदी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत काँग्रेसने पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणातील आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर न्यायालयाने मोदी सरकारला शपथेवर खोटी साक्ष देणे आणि न्यायालयाच्या अवमाननेप्रकरणी नोटीस देण्याचीही मागणी कॉंग्रेसने केली आहे. पंतप्रधान कुंभच्या धार्मिक यात्रेला जातानाही खोटे बोलत आहेत. त्यांनी गंगा नदीत जाऊन डुबकी घ्यावी, असा टोला कॉंग्रेसने लगावला आहे.

पंतप्रधान मोदींनी रविवारी सोनिया गांधी यांचा मतदारसंघ रायबरेली येथे राफेलवर सुरु असलेल्या वादावरुन काँग्रेसवर टीका केली होती. त्यांनी राहुल गांधी हे खोटं बोलत असल्याचा आरोप करत जे लोक देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यामागे काँग्रेस उभी राहत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन मोदींना प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी राफेल विमानांच्या किंमतीवरुन कॅगचा अहवाल संसदेच्या लोकलेखा समितीसमोर सादर केल्याचे सांगून सरकारने विशेषाधिकाराचा अवमान केला आहे. ते कुंभच्या धार्मिक यात्रेवर जातानाही खोटं बोलत आहेत. त्यांनी पापक्षालन करायला हवं, त्यांनी पवित्र गंगा नदीत जाऊन स्नान केले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

राफेलबाबत जो निर्णय आला आहे, त्यामध्ये विरोधाभास आहे. सर्वोच्च न्यायालय योग्य व्यासपीठ नाही. याचा केवळ जेपीसीमार्फतच तपास झाला पाहिजे. सरकारने सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली आहे. त्या आधारावरच न्यायालयाने निकाल दिला आहे. सरकारने किंमतीची विस्तृत माहिती कॅगला दिली. त्यानंतर कॅगने तपास करुन ती पीएसीला दिली. ही चुकीची माहिती सरकारने न्यायालयाला दिली आहे. कॅगचा अहवालही आला नाही आणि तो पीएसीलाही देण्यात आला नाही. सरकारने आता दुरुस्तीसाठी अर्ज केला आहे. यावरुन सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली असल्याचे त्यांनी म्हटले.