कुंभारी बुद्रुक गावातील कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

पहूर, ता.जामनेर : येथून जवळच असलेल्या कुंभारी बुद्रुक येथील कर्जबाजारी शेतकर्‍याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. आसाराम रानु जोशी (58) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.

कर्ज झाले डोईजड
कुंभारी बुद्रुक, ता.जामनेर येथील आसाराम रानु जोशी (58) यांच्यावर बँकेचे तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज होते. त्यातच विविध कार्यकारी सोसायटीचे कर्मचारी गेल्या दोन-तीन दिवसांपासून वसुलीसाठी तगादा लावत असल्याने या सर्व प्रकाराला कंटाळून शेतकरी आसाराम राणू जोशी (58, कुंभारी बुद्रुक, ता.जामनेर) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, असा मोठा परीवार आहे. पहूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून पहूर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुरवाडे तपास करीत आहे.