कुकडी नदीत धरणातून पाणी सोडण्याची मागणी

0

विहिरी, बोअरवेल आटले; साळवाडीचे शेतकरी चिंतेत

जुन्नर : कुकडी नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने नदीला पाणी सोडण्याची मागणी साळवाडी परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे. जुन्नर तालुक्याच्या असलेल्या येडगाव धरणातून सुरू झालेली कुकडी नदी येडगाव, पिंपळवंडी, वडगाव कांदळी, भोरवाडी, साळवाडी, जाधववाडी, बोरी बुद्रूक साकोरी, मंगरूळ, पारगाव या गावांच्या परिसरात अल्प प्रमाणात पाऊस झालेला असून परिसरातील शेतकर्‍यांनी चांगला पाऊस होईल या आशेवर, तसेच नदीच्या पाण्याच्या जोरावर अनेक पिके घेतलेली आहेत. मात्र, पाऊसच न झाल्यामुळे त्यातच कुकडी नदीचे पात्र कोरडे पडल्याने, परिसरातील विहिरी, बोअरवेल पूर्णपणे आटल्या आहेत, त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांनी नदीच्या पाण्याच्या जोरावर ऊस, कांदा, गहू, हरभरासह पालेभाज्या, टोमॅटो, गवार, वांगी ही पिके घेतलेली आहेत.

पाण्याअभावी पिके जळाली

या भागात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकर्‍यांनी जनावरांसाठी लागणारा चारा यामध्ये मका, ज्वारी, हत्ती गवत, घास अशी पिकेदेखील मोठ्या प्रमाणात घेतली आहेत, परंतु या पिकाला पाणीच मिळत नसल्याने, ही पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. जुन्नर तालुक्यात वडज, येडगाव, माणिकडोह, पिंपळगाव जोगे, चिल्हेवाडी ही पाच धरणे असूनही धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असताना या तालुक्यात पाण्याचा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे कुकडी नदीला त्वरीत पाणी सोडावे, अशी मागणी नदी काठावरील शेतकर्‍यांनी केली आहे.